मुरुडला आभाळच फाटलं ; अतिवृष्टीसह भरतीने हाहाकार

शेकडो घरांमध्ये पाणी; दोन बोटींना जलसमाधी
2 बोटीना वाचविले; कोट्यवधींची हानी
मुरुड | सुधीर नाझरे | संतोष रांजणकर
गणेशोत्सव तोंडावर असतानाच वरुणराजाचा प्रकोप काय असतो हे मुरुडच्या जनतेने सोमवारी रात्री अनुभवले.ढगफुटी सदृश्य स्थिती मुरुड शहरासह परिसरातील गावांमध्ये निर्माण झाली होती.अवघ्या काही तासात मुरुड तालुक्यात 475 मिमी असा विक्रमी पाऊस पडला.यामुळे परिसरात हाहाकार उडाला.शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठी हानी झाली.याशिवाय समुद्रात दोन बोटींना जलसमाधी मिळाली असून दोन बोटींना समुद्राच्या पाण्यातून मोठ्या मुश्किलीने खेचून बाहेर काढण्यात आले आहे.
मुरूड तालुक्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. खारआंबोली धरणाचे ओव्हरफ्लो होणारे पाणी एकदरा खाडीत समुद्राला मिळते. रात्री ओहोटीचे पाणी समुद्रात खेचले जात असताना धरणाचेही ओव्हरफ्लो झालेले पाणी आल्याने प्रवाह खूप वाढला आणि एकदरा येथील किनारी नांगरलेल्या बोटींचे नांगर तुटून बोटी मुरुडच्या किनार्‍यावर आल्या व मुरुड किनारी बांधलेल्या बोटींवर आपटून प्रवाहात उलटल्या.या उलटलेल्या बोटी समुद्रात वाहून निघाल्या होत्या. मात्र कोळी बांधवानी कमालीचे प्रयत्न करून इतर बोटींच्या साह्याने 2 बोटी किनार्‍यावर आणल्या.तरीही त्यातील एका बोटीला जलसमाधी मिळाली तर 2 बोटींना वाचवण्यात यश प्राप्त झाले आहे.
एकदरा खाडीतील पाण्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाल्याने मच्छीमार बोटी दोर तुटून वाहून गेल्या यातील मुरुड येथील जंजीरकर यांच्या बोटीला जलसामधी मिळाली व एकदरा येथील त्यांचेच भाऊबंद जंजीरकर यांच्या ही बोटील जलसमाधी मिळाली. तिसरी बोट मुरुड बीचवर वाळूत जाऊन अडकली होती ती सुखरूप वाचता आली. इतर दोन बोटी वाहून जात असताना इतर बोटींच्या सहाय्याने वाचवण्यात आल्या. त्यामुळे एकदरा व मुरुडच्या जांजिरकर कुटुंबाच्या बोटींचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
ही घटना स्तानिक मच्छीमारांच्या लक्षात येताच मच्छीमार बाधावांनी मिळून बोटी वाचविण्याचा शर्थीचे प्रयत्न सुरू केले. एकदरा येथील जंजीरकर यांची बोट वाचवण्यात यश आले. मुरुड येथील जंजिरकर यांच्या बोटीला पाण्यातून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न स्थानिक मच्छीमार करत आहेत. तरी या दोन्ही बोटीवर असलेली झाली वाहून गेली व बोटीचे इंजिन मध्ये पाणी गेल्याने निकामी झाले. त्यामुळे या दोन्ही बोटीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

अतिपाऊस आणि समुद्राच्या भरतीचा प्रवाह खपू मोठा होता त्यामुळे नांगर तोडून बोटी पाण्यात वाहून गेल्या.मात्र, देवाची कृपा म्हणून वाचली आहे.तरीही नुकसान खूप झाल्याने सरकारी मदतीशिवाय पुन्हा उभे राहणे शक्य नाही.
धनंजय पाटील,बोटीचा मालक

अनेक घरांमध्ये पाणी
मुरुडमध्ये पाऊस इतका प्रचंड होता की गारंबी तसेच व खार अंबोली येथून येणार प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे मुरुड शहरातील भोसले वाडी, लक्ष्मी खार, शेगवाडा परिसरात अनेक घरात पाणी शिरले होते.

मुरुडमध्ये 475 मिमी पाऊस
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 57.06 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3148.28मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.सर्वाधिक पाऊस मुरुड तालुक्यात 475 मिमी इतका झाला आहे.मुरुडप्रमाणेच श्रीवर्धन153,तर म्हसळा येथे 105 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
याशिवाय अलिबाग- 18, पेण- 7,पनवेल- 2.20,उरण-3 , कर्जत- 4 , खालापूर- 13, माणगाव- 13,रोहा- 46, सुधागड-35,तळा-3,महाड- 11,पोलादपूर-14, माथेरान- 10.70 . एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 97.88 टक्के इतकी आहे.

जनजीवन विस्कळीत
ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हजेरी लावत पावसाने मुरुड तालुक्यात धिंगाणा घातला.गेले काही दिवस रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. काही ठिकाणी उघडीप करणार्‍या पावसाने सोमवारी रात्री मुरुड तालुक्यांत धिंगाणा घातला. रात्री अचानक ढगफुटी झाल्याने अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गावात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा बोर्‍या तर, वाहतुकीचेही तीन-तेरा वाजले.

मांडला पूल गेला वाहून; साळव तपासणी नाक्याजवळ दरड
पावसामुळे बोर्ली मांडला विभागातील मांडला पूल गेला वाहून गेला. काशीद पुलाच्या जोडरस्त्यावरून पाणी वाहून गेले. साळव तपासणी नाका येथे रात्री दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. महसूल व पोलिस यंत्रणा, गडथ कंपनी यांच्या सहकार्याने साळाव-मुरूड आणि साळाव-रोहा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. मुरुड तालुक्यातील मुरुड शहर, मांडला, बोर्ली, चोरढे, माजगाव, खारीक वाडा, खारदोडकुले या गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. आता पाणी ओसरले असून, पाऊसही थांबला आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सजग आहे.
पंडित पाटील यांच्याकडून पाहणी
मुुरुड परिसरात झालेल्या नुकसानीची शेकाप नेते पंडित पाटील यांनी तातडीने पाहणी करुन आपदग्रस्तांना दिलासा दिला.शेकापतर्फे सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.तसेच शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन आपदग्रस्तांना तातडीने मदत पुरवावी,अशी मागणीही त्यांनी केली.यावेळी त्यांनी बोर्ली बाजारपेठेतील परिस्थितीची पाहणी करुन व्यापार्‍यांशी संवाद साधला.मुरुडमध्येही मच्छिमारांशी संवाद साधला.

वांदेलीवरील पूल कोसळला
दरम्यान,या पावसाने वांदेली नदीवरील पूल कोसळला आहे.यामुळे या परिसरातील नागरिकांच्या येण्याजाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.हा पूल अवघ्या एक वर्षापूर्वीच बांधण्यात आला होता.तरीही तो कोसळल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version