मुरुडकर शिधाच्या प्रतीक्षेत

Exif_JPEG_420

आनंदाचा शिक्षा पोहोचला नसल्याने नाराजी
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील 17 हजार 275 शिधापत्रिकाधारक ‘आनंदाचा शिधा संचाच्या प्रतीक्षेत आहेत. गुढीपाडवा व बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक किलो रवा, एक लीटर पामतेल, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर या चार जिन्नसांचा समावेश असलेल्या आनंदाचा शिधा संच उपलब्ध करुन देण्याचा निर्णय 22 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य शासनाने दिला होता. त्यानुसार काही जिल्ह्यातील तालुक्यात आनंदाचा शिधा संचाचे वितरण सुरू करण्यात आले आहे. परंतु, मुरुड तालुका यापासून वंचित रहिला आहे.

दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा संचाचे वितरणही उशिरा झालं. आताही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आनंदाचा शिधा संचाचे वितरण कधी होणार, असा प्रश्‍न शिधापत्रिकाधारकांनी आज रेशन दुकानदारांना विचारणा केली असता, रेशनधारकांनी सांगितले की, आनंदाचा शिधामधील चार वस्तूंपैकी एक वस्तू आमच्याकडे प्राप्त झाली असून, तीन वस्तू येणं बाकी आहे. तरी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन स्वस्त धान्य दुकानदारांनी केले.

आमच्या प्रतिनिधीने तालुका पुरवठा अधिकारी छाया वरसोलकर यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता. त्या म्हणाल्या की, गुढीपाडवा सणानिमित्त शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा संचापैकी पामतेल प्राप्त झालं आहे. प्राप्त झालेली वस्तू स्वस्त धान्य दुकानात देण्यात आली आहे. बाकी तीन वस्तू एक-दोन दिवसात प्राप्त होतील आणि लवकरच आनंदाचा शिधा संचाचे वाटप तालुक्यातील ग्रामीण भागातील 28, तर शहरात 4 स्वस्त धान्य दुकानांत पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले जातील.

Exit mobile version