मुरुडकरांच्या नशिबी जुन्याच बसेस

अरुंद रस्त्यांमुळे नवीन बसेसची आशा मावळली
लांबीने जास्त बस चालविणे धोक्याचे

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील काही रस्ते अरुंद असल्यामुळे नवीन बसेस मंजूर असूनसुद्धा एसटी डेपोत नवीन बसेस येऊ शकल्या नाहीत. ज्या नवीन बसेस मंजूर झाल्यात, त्या बसेस जुन्या बसेसपेक्षा दोन मीटरने लांबीने जास्त आहेत, त्यामुळे चालकांना या अरुंद रस्त्यावरुन गाडी चालवणे धोक्याचे होऊ शकतो. त्यामुळे आता नवीन बसेसची आशा मावळल्यात जमा आहे. प्रवाशांना जुन्या बसेस मध्येच प्रवास करावा लागणार आहे.

एकेकाळी राज्यात अव्वल ठरलेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड एसटी आगाराला या मोठ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांमुळे मुरुड आगाराचा नावलौकिक कमी होत चालला आहे. याकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्‍यांशी अरूंद रस्त्यासंदर्भात चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढणे जरूरी होते; परंतु अजूनपर्यंत तोडगा निघाला नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुरुड जंजिरा पर्यटन स्थळ असल्याने देश-विदेशातून पर्यटक ये-जा करीत असतात. मुरुडला येण्यासाठी एसटी बसेस ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सध्या मुरुड डेपोला 38 बसेस असून, त्यापैकी 13 बसेस निमआराम, तर 25 बसेस साध्या आहेत. यापैकी 13 निमआराम व 10 साध्या बसेसचा कालावधी संपत आहे. 15 बसेस घेऊन एसटी डेपो चालविणे कठीण होईल, यांचा नाहक त्रास गरीब प्रवाशांना होणार आहे. तरी या गंभीर प्रश्‍नाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करावे व मुरुड-नादगांव व मुरूड-बाजारपेठ येथील अरुंद रस्त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याशी चर्चा करून पर्याय रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करावी, अशी मागणी प्रवासी व मुरुडकर करीत आहेत.

एसटी महामंडळाने आपल्या डेपोकरिता 13 नव्या बसेस मंजूर केल्या आहेत. परंतु, मुरुड येथील अरुंद रस्त्यांमुळे आपल्या डेपोत एसटी बसेस पोहोचू शकल्या नाहीत. याआधी ही शिवशाही गाडी चालवण्याचा प्रयत्न आपण केला होता. पण, ती गाडीही टन मारताना कित्येक छोटे अपघात झाले आहेत. यामुळे चालकांना यांचा आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे शिवशाही गाडी बंद करावी लागली आहे. जोपर्यंत पर्यायी रस्ता मिळत नाही, तोपर्यंत नवीन बसेस आपल्या डेपोत येऊ शकत नाही.

सुनील वाकचौरे, आगार व्यवस्थापक, मुरुड

Exit mobile version