लॉकडाऊन उठत असल्याने मुरूडच्या पर्यटनाला अच्छे दिन

मुरूड जंजिरा | प्रकाश सद्रे |                  

लॉकडाऊन टप्याटप्यानेउठविण्यात येत असल्याने पुर्णतः थांबलेल्या मुरुडच्या पर्यटनाला लवकरच मोठा बहर येईल असे दिसून येत आहे.जुलै महिन्यात अतिवृष्टी मुळे वाहून गेलेले रस्ते आणि खचलेल्या रस्त्यांची दुरुस्ती विशेष बाब म्हणून तातडीने शासनाने हाती प्रथम हाती घेणे अत्यन्त गरजेचे आहे, त्याच बरोबर  जंजिरा जलदुर्गासारखी वास्तू पर्यटकांसाठी युद्धपातळीवर सुरू करणे आवश्यक आहे, असे मत पर्यटन क्षेत्रातील तज्ञ मंडळीनी काल बोलताना व्यक्त केले.                   

अजूनही समुद्र शांत झालेला दिसत नाही. वादळी पावसाची शक्यता देखील आहे .1  ऑगस्ट पासून  मासेमारीस अधिकृतपणे सुरुवात झाली असून   काही नौका मच्चीमारी साठी  गेलेल्या आहेत; मात्र समुद्र खाडी पट्यातील  पाण्याचा वेग पाहता पर्यटकांसाठी जंजिऱ्यात प्रवाशी जलवाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. बहुधा 15 ऑगस्ट पासून जंजिऱ्यातील पर्यटक वाहतूक सुरू होऊन जंजिरा खुला होईल असे संकेत जंजिरा जलवाहतूक संस्थेच्या काही  संचालकाकडून काल  राजपुरी  येथे सांगण्यात आले.परन्तु त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पुरातत्व विभाग कडून आदेश येतील त्या प्रमाणे जंजिरा जलदुर्ग खुला करण्यात येईल अशी माहिती बंदर निरीक्षक श्री बारापात्रे , यांनी दिली.आजही जंजिरा हेच पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून काशीद बीच,  बारशिव बीच,नांदगाव बीच आणि मुरूड बीच देखील  पर्यटकांना विलक्षण भावतात. पावसाळ्यात मुरूड परिसरातील निसर्ग रम्य परिसर आणि  समुद्र किनाऱ्याचे विलोभनीय रूप  खूपच मनमोहक दिसून येत असून अथांग समुद्राच्या लाटा  पाहुन रोमांच उभे राहत आहेत.असे दृश्य पर्यटकांना खूपच भावेल असे स्पष्ट दिसून येते.पर्यटनाला हा काळ अत्यंत रमणीय आहे.ताजी मासळी देखील उपलब्ध होत आहे.येथील लॉकडाऊन पूर्णपणे उठलेला नसल्याने हॉटेल्स आणि लॉजिंग मालकांतून काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे.शनिवार पासून तीन दिवस सलग सुट्टी असल्याने मुंबई पुण्यांतून पर्यटकांचे दूरध्वनी  आम्हाला येत असल्याची माहिती मुरूड येथील साई गोरी रेस्ट हाऊस चे मालक मनोहर बैले यांनी काल दिली.मुरूड तालुक्यात पर्यटन व्यवसाय पूर्ण बंद पडल्याने व्यावसायिक  खूपच हवालदिल असून नोकरांचे पगार किंवा वीज भरणे  देखील अत्यंत अवघड झाल्याचा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.काशीद बीचवर देखील स्टाल्स धारकांनी साफसफाई सुरू केल्याची माहिती काशीद येथील कार्यकर्ते सुनील दिवेकर यांनी दिली.काशीद परिसरात व्यवसायिकांची परिस्थिती गंभीर असून कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून दोन वेळचे जेवण  देखील मुश्किल झाल्याची माहिती सुनील दिवेकर यांनी दिली. पर्यटन व्यवसाय त्वरित सुरू होणे फार महत्त्वाचे आहे असे मत काशीद मधील अनेक व्यवसायिकांनी सांगितले.काशीद बीचवर 45 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत, अनेक रेस्ट हाऊसेस आहेत. मुरूड, नांदगाव मध्ये देखील हीच परिस्थिती आहे.       

रस्ते सुरक्षित करा  

पर्यटकांना मुरूड तालुक्यात येण्यासाठी सुरळीत आणि उत्तम सुरक्षित रस्त्यांची मोठी गरज आहे.मात्र अतिवृष्टी मुळे पूल, साकव, रस्ते ठिकठिकाणी खचल्यानें  पर्यटकांना धास्ती  वाटणे साहजिकच आहे. समुद्र किनारा असला तरी मुळात हा डोंगरी तालुका असल्याने डोंगराच्या कडेने रस्ते मुंबई अलिबाग किंवा रोहा कडून आलेले आहेत. रस्ते मजबूत राहण्यासाठी येथे शासनाकडून विशेष निर्देश आणि निधी देण्याची आवश्यकता आहे.सध्या चिकणी, आणि विहूर गावानजीक मोरी आणि रस्ता खचल्यानें एस टी आणि अवजड वाहनांची वाहतूक बंद आहे.त्यामुळे पर्यटनावर देखील मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येते.त्यामुळे सुयोग्य आणि रुंद रस्ते ही काळाची गरज आहे.नुसते राजकारण होऊन चालणार नाही.रोजगार निर्मिती झाली पाहीजे. कारण सर्व कोरोना काळात रुतलेले अर्थचक्र सुरू झाले तरच जीवनाला मोठी उभारी येईल आणि पर्यटनाला   अच्छे  दिवस येणार हे मात्र निश्चितच !

Exit mobile version