| रसायनी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील तुपगाव येथील समाजसेवक यासीन भालदार व त्यांचे बंधू शरीफ भालदार यांनी याहीवर्षी गणपती बाप्पाला निरोप देताना पुष्पवृष्टी करुन हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले. खालापूर तालुक्यातील तुपगाव येथील मुस्लिम बांधव समाजसेवक यासिन भालदार,माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य शरीफ भालदार, सत्तार भालदार यांनी आपले वडील पै. शेखअली भालदार यांच्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेऊन सर्व तुपगाव ग्रामस्थ यांच्या घरगुती गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना पुष्पवृष्टी करून प्रसाद वाटप केला.या स्तुत्य अभिनव उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम उपस्थित होते. समाजसेवक यासिन भालदार यांनी सुरू ठेवलेली ही परंपरा कायम ठेऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास सपोनि. युवराज सुर्यवंशी, सरपंच रविंद्र कुंभार, ज्येष्ठ किर्तनकार व रायगड भुषण हभप.वसंतमहाराज कुंभार,रुपेश दळवी,कादिर खेसे, सिध्दीक भालदार, अमीन भालदार, योगेश गुरव, विजय ठोसर,राजेश गुरव, राहुल गुरव यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जामा मस्जिद कमिटी तुपगाव यांनी विशेष परिश्रम घेतले.