ग्रामपंचायतीच्या जागेची परस्पर विक्री

वडगाव ग्रामस्थांमध्ये संताप; पायवाट बंदीचा धोका

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

वडगाव येथील ग्रुप ग्रामपंचायतीस पाणीपुरवठ्यासाठी देण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीची जागा परस्पर विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित ठिकाणी सध्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ग्रामस्थांच्या पायवाटीवरही बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या जागेवर गेल्या सुमारे 15 वर्षांपासून पाण्याची टाकी उभी होती. टाकीच्या देखभालीसाठी मूळ मालकाच्या मुलाला कामावर ठेवण्यात आले होते. मात्र, टाकी जीर्ण झाल्यानंतर ती पाडण्यात आली आणि जागा सपाट करण्यात आली. याचाच फायदा घेत संबंधित मालकाने जागेची परस्पर विक्री केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

दरम्यान, या जागेवरून गावकऱ्यांची पायवाट जात असल्याने सुरू असलेल्या बांधकामामुळे स्थानिकांच्या दैनंदिन ये-जा व्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका काय आहे आणि ही विक्री कायदेशीर आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामस्थ नथुराम गडगे यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे लेखी तक्रार करून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. एकूणच, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेच्या कथित विक्री प्रकरणामुळे वडगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

ही जागा ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी देण्यात आली होती. मोबदल्यात संबंधिताच्या मुलाला काम देण्यात आले होते. टाकी जीर्ण झाल्यानंतर ती पाडली, मात्र त्यानंतर जागेची परस्पर विक्री करून आमच्या पायवाटीचा प्रश्न निर्माण केला आहे. ही ग्रामपंचायतीची फसवणूक असून, संबंधितांवर कारवाई व्हावी.

नथुराम गडगे,
ग्रामस्थ

या जागेवर घराचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात संबंधितांना आठ दिवसांत बांधकाम हटवून जागा मोकळी करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

सुहास वारे,
ग्रामविकास अधिकारी
Exit mobile version