दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री

वृद्ध आईसह चार मुलींचा फसवणुकीचा आरोप

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील वडवली तर्फे वरेडी येथे एका वृद्ध आईसह तिच्या विवाहित चार मुलींनी दलालांकडून गंभीर फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. चुलत भावाच्या आजाराचे कारण पुढे करत त्याच्या उपचारासाठी मदत म्हणून जागा विकण्याचा बहाणा करण्यात आला. मात्र, या निमित्ताने दलालांनी त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत संपूर्ण जमीन परस्पर दुसऱ्याला विकल्याचा दावा पीडितांनी केला आहे.

नेरळ मंडळ अधिकारी हद्दीतील व तलाठी सज्जा माणगाव अंतर्गत वरेडी परिसरातील कर्जत-कल्याण राज्य मार्ग व रेल्वे पट्ट्यालगत असलेल्या विविध सर्व्हे क्रमांकांतील जमीन ही मूळतः लक्ष्मण पोसू मराडे यांच्या नावावर होती. मराडे यांनी 2006 साली मृत्युपत्र करून आपल्या पाच मुलींना वारसदार म्हणून घोषित केले होते. त्यांच्या निधनानंतर मुलींची लग्ने होऊन त्या आपापल्या संसारात व्यस्त झाल्या.

ग्रामीण भागात “जमीन कुठे जाणार आहे” या समजुतीमुळे जमिनींकडे दुर्लक्ष होते, याचाच फायदा घेतल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. नातेवाईकांतील चुलत भाऊ आजारी असून, त्याच्या हिस्स्याची जमीन विकून उपचारासाठी मदत करण्याची विनंती दलालांनी केली. या भावनिक कारणाला भुलून मुलींनी सहमती दर्शवली. मात्र, प्रत्यक्षात संपूर्ण जमिनीचा व्यवहार अशोक रोहिला यांच्याशी केल्याचे पुढे उघड झाले.

पीडित वृद्ध आई शारदाबाई लक्ष्मण मराडे व त्यांच्या मुली वंदना हरिश्चंद्र भोईर, आशा जनार्दन इरमाळी, गुलाब अनंता शिंगटे, रेणुका अनंत शिंगटे व हिरा उल्हास इरमाळी यांनी गावातील मध्यस्थ तसेच कर्जतमधील काही दलालांची नावे घेतली असून, या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, संबंधित जमीन खरेदी केल्यानंतर मुंबईतील नव्या मालकांनी जागेवर काम सुरू केले असता, या मुलींना प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने कामाला विरोध करत ते बंद पाडले. त्यानंतर जमीन विक्री झाल्याचे समजताच फसवणूक झाल्याचा धक्का बसलेल्या कुटुंबाने न्यायालयात धाव घेतली असून, नेरळ पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. मात्र, न्याय मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कर्जत तालुक्यात अशा प्रकारच्या जमीन फसवणुकीची ही पहिलीच घटना नसून, यापूर्वीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अनेक वेळा या व्यवहारांमध्ये प्रभावशाली व्यक्ती व बाहेरील धनाढ्य गुंतवणूकदारांची नावे समोर येतात. पैशाच्या बळावर कायदेशीर लढाई लांबवली जाते आणि यात सर्वसामान्य, अशिक्षित शेतकरीच भरडला जातो. पिढ्यानपिढ्या जपलेली जमीन हव्यासापोटी हिरावली जाणे ही चिंतेची बाब ठरत आहे.

आमच्या चुलत भावाच्या आजाराचे कारण पुढे करून त्याच्या उपचारासाठी पैसे उभे करण्याच्या नावाखाली संबंधित दलालांनी आम्हाला जागा विकण्यास प्रवृत्त केले. आमच्या भावनांचा व अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत त्यांनी चुलत भावाच्या हिस्स्यासह आमच्या हक्काची संपूर्ण जमीन परस्पर दुसऱ्याला विकली. या व्यवहारात आमच्याशी एकही रुपयाचा व्यवहार झालेला नाही. आमची सरळसरळ फसवणूक झाली आहे.

– वंदना हरिश्चंद्र भोईर व इतर, पीडित वृद्ध आई व मुली

Exit mobile version