म्हैसूर रोड जंक्शनला मिन्नू मणीचे नाव

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय महिला क्रिकेट संघाने आताच बांगलादेशचा दौरा केला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघ व्यवस्थापनाने मिन्नू मणीला प्रथमच आंतरराष्ट्रीय संघात संधी दिली. त्यानंतर तिचा अंतिम संघात समावेश करण्यात आला होता. मिन्नूने संधीचा पुरेपूर फायदा घेत चमकदार कामगिरी केली. तिच्या कामगिरीमुळे तिचे नाव म्हैसूर रोड जंक्शनला देण्यात आले आहे.

केरळमधील वायनाड हे मिन्नूचे मूळ गाव आहे. राष्ट्रीय संघातील तिच्या कामगिरीबद्दल मिन्नूचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला. एका रेल्वे जंक्शनला तिचे नाव देण्यात आले आहे. म्हैसूर रोड जंक्शन आता ‌‘मिन्नू मणी जंक्शन’ म्हणून ओळखले जाईल. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंठावाडीतल्या मिन्नूच्या घराकडे जायला रस्ता नाही. तरीही 24 वर्षीय क्रिकेटपटू आनंदी आहे की तिच्या मूळ शहरातील लोकांनी तिच्या नावावर एका मोठ्या जंक्शनचे नाव दिले आहे.

क्रिकेटपटूच्या सन्मानार्थ झालेल्या बैठकीत नेत्यांनी क्रिकेटपटूच्या घरापर्यंत रस्ता बांधण्याचे आश्वासन दिले आहे. मंठावाडीचे आमदार ओ.आर. केळू म्हणाले की, महापालिकेच्या रस्त्यापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या मणीच्या घरापर्यंत रस्ता बांधण्याची चर्चा झाली. 14 जुलै रोजी मंठावाडी नगर परिषदेच्या बैठकीत नगरपालिकेच्या ‌‘म्हैसूर रोड जंक्शन’चे नाव बदलून ‌‘मिनू मणी जंक्शन’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंठावाडी नगरपालिकेचे अध्यक्ष सी. के.रथनवल्ली यांनी हा निर्णय घेतल्याचा खुलासा केला.

मिन्नू मणीने अलीकडेच 09 जुलै रोजी मीरपूर येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. सुलतानाला बाद करून तिने टी-20 मधली पहिली विकेट मिळवली. तिने उरलेल्या दोन सामन्यांमध्ये चार विकेट घेतल्या.

Exit mobile version