नागेवाडीची पाणी समस्या दूर

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील नागेवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारी विहिर आटली असून ग्रामस्थांना वाडीपासून चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत होते. भास्कर दिसले यांनी आदिवासी ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडवली आहे. तेथे ग्रांमस्थांसाठी बोअरवेल खोदून देत वाडीमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध केले आहे.

साडेपाचशे लोकांची वस्ती असलेल्या नागेवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. स्थानिक आदिवासी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय करून देणार्‍या विहिरींमध्ये असलेल्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक आदिवासी लोकांना दूरवर जावून पाणी आणावे लागत आहे. त्यात कर्जत पंचायत समितीने नागेवाडीसाठी टँकरने पाणी पुरवठा सुरू केलेला नव्हता. त्यामुळे यावर्षी अचानक उद्भवलेल्या पाणी समस्येवर कशी मात करायची, असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

मात्र, गावावर आलेली परिस्थिती लक्षात घेउन भास्कर दिसले यांनी स्वखर्चाने बोअरवेल खोदून दिली. या निमित्ताने नागेवाडी मधील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाल्याने स्थानिक आदिवासींची पायपीट थांबली असून यावेळी ग्रामस्थांनी भास्कर दिसले यांचे आभार मानले.

Exit mobile version