नागोठण्याला वादळी वाऱ्याचा तडाखा

| नागोठणे | प्रतिनिधी |

कडक उन्हामुळे सर्वजण त्रस्त झालेले असतांनाच नागोठणे शहर व परिसरात शनिवारी (दि.9) दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने नागोठणे व परिसराला झोडपून काढले. या वादळ वाऱ्यासोबत पाऊस मात्र तुरळक स्वरूपात पडल्याचे दिसून आले. या अचानक आलेल्या वादळ वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे सर्वत्र हाहाकार उडाल्याचे दिसून आले. परिसरात सुमारे अर्धा ते पाऊण तास प्रचंड वेगाने वारे वाहिल्याने नागरिकांच्या घराचे पत्रे, कौले उडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिसरात अचानक आलेल्या या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे नागोठणे शहर व परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या कानसई येथील उपकेंद्रातून येणारा विजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद करण्यात आला होता.

त्यामुळे सर्व परिसराला होणारा विजपुरवठा सुद्धा बंद होता. वातावरण सुरळीत झाल्यावर विजपुरवठा सुरळीत चालू होईल असे वीज वितरणाच्या नागोठणे कार्यालयातील सहायक अभियंता सत्येंद्र सिंग यांच्याकडून समाजमाध्यमांवर संदेशांद्वारे सांगण्यात आले होते. दरम्यान या वादळ वाऱ्यामुळे परिसरात नागरिकांचे नुकसान झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version