पाणदिवे शाळेत निसर्ग संवर्धनाचा जागर

| उरण | प्रतिनिधी |

वन्यजीव सप्ताह 2026 निमित्त पुंडलिक रामा पाटील इंग्रजी माध्यम शाळा, पाणदिवे-उरण येथे फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था, चिरनेर, ता. उरण, जि. रायगड यांच्या वतीने निसर्ग संवर्धनविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वन्यजीवांचे निसर्गातील महत्त्व, सर्पओळख, सर्पदंशावरील प्रथमोपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना यांसह पर्यावरणाशी संबंधित विविध गंभीर विषयांवर विद्यार्थ्यांशी आणि उपस्थितांशी संवाद साधण्यात आला.

‌‘शून्य सर्पदंश मृत्यू अभियान‌’ हा कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण विषय होता. सापांच्या विविध प्रजातींची ओळख, सापांविषयी असलेले गैरसमज दूर करणे, सर्पदंशाच्या घटना टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि सर्पदंश झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. साप आणि इतर वन्यजीव हे पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष जयवंत ठाकूर आणि राकेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून निसर्ग, वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि निसर्ग संरक्षणाची भावना रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका योगीता गुरुनाथ गावंड, प्राची प्रशांत परदेशी, हेमांगी शैलेश गावंड, स्मिता मंगेश जाधव, सुरक्षा अविनाश भोईर आणि मनाली गावंड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वन्यजीवांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर यांचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरला.

Exit mobile version