प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
। पनवेल । प्रतिनिधी ।
नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचा कारभार सध्या विस्कळीत होत असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः सकाळच्या गर्दीच्या वेळेत खोपोली–कर्जत मार्गावरील बस वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे चाकरमानी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
चालत्या बसमध्ये अचानक बिघाड होऊन प्रवाशांना मध्येच उतरावे लागते. त्यामुळे वेळेवर कामावर किंवा महाविद्यालयात पोहोचणे कठीण होत आहे. सोमवारी (दि.6) पळसपे फाटा तर आज मंगळवारी ठाणा नाका येथे बस सेवा बंद पडली. या समस्येमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प असतानाही परिवहन सेवेच्या देखभालीकडे दुर्लक्ष का होत आहे?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नवीन बस ताफ्यात दाखल झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा प्रवाशांना होताना दिसत नाही.
डेपोमधून बस सुटण्यापूर्वी त्यांची योग्य तपासणी केली जाते का, याबाबतही शंका उपस्थित होत आहे. ‘चलती का नाम गाडी’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका प्रवाशांकडून केली जात आहे.
दरम्यान, ही समस्या तातडीने सोडवून बससेवा सुरळीत करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. तर प्रवाशांचा प्रश्न अखेर कधी मार्गी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







