नवरंग पक्ष्याला मिळाले जीवदान

| पनवेल | प्रतिनिधी |

एप्रिल-मे महिन्याने वाढलेल्या उष्म्याने नागरिक, प्राणी, पक्षी त्रासले आहेत. सर्व या उष्म्यापासून थंडगार सावली आणि पाणी शोधत असतात. पनवेल परिसरात शनिवारी इंडियन पिट्टा म्हणजे नवरंग पक्ष्याचे दर्शन घडले. हा पक्षी पावसाचे संकेत देत असतो.

दक्षिण भारतातून या पक्ष्याचे आगमन होत असते. पक्षी अभ्यासक माधव आठवले यांचा मित्र अभय जोशी यांना नवरंग पक्षी जखमी अवस्थेत दिसून आला. त्यानंतर त्यांनी लागलीच माधव आठवले यांना फोन केला. त्यांनी तात्काळ घटनस्स्थळी जात नवरंग पक्ष्याला घरी आणून त्याच्यावर उपचार केले.

नवरंगाच्या विणीचा काळ मे ते ऑगस्ट असून, गवत, झाडांचे मूळ, काड्या यापासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते. पक्ष्यातील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. त्यांच्यात निळा, हिरवा, काळा, पांढरा, तांबडा हे भडक रंग प्रामुख्याने दिसतात. हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असून, भुंड्या शेपटीचा आहे. त्याचा पोटाखालचा व शेपटीखालचा रंग किरमिजी असतो. नवरंग पक्षी उडताना पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात. झुडपी जंगलात राहणे अधिक पसंत करणारा हा पक्षी आपला बहुतेक वेळ जमिनीवर घालवतो. त्याचा व्हीट-ट्यू असा आवाज सकाळ-संध्याकाळ ऐकू येतो. हा ढगाळ हवेत दिवसभर आवाज करतो.

Exit mobile version