कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या मार्गावर

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात राष्टवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांच्या मुलांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली असल्याने पक्षात धुसफूस सुरु आहे. दरम्यान, आगामी काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडण्याची शकयता निर्माण झाली असून काही बडे नेते शिवसेना शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका आणि नजीकच्या काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची युती अशी लढत अपेक्षित आहे. त्यामुळे आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांच्या या पक्षातून त्या पक्षात असे प्रवेश सुरु झाले आहेत. त्यात आता नजीकच्या काळात सर्वात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसण्यास सुरुवात झाली आहे, असे घडत असलेल्या राजकीय घडामोडी यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मधील मोठ्या नेत्याच्या मुलाने उपसरपंच पदासाठी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली होती. हे उदाहरण ताजे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणखी एका जिल्हास्तरीय नेत्याच्या मुलाने देखील शिवसेना शिंदे गटामध्ये आपले राजकीय भविष्य ओळखावून प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला दिसून आला आहे. मात्र आगामी काही कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठा भूकंप होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक मोठे नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. अशी माहिती विश्‍वसनीय सूत्राकडून मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील मोठे नेते हा भूकंप रोखणार कसा, असा प्रश्‍न आहे. त्यात माजी आ. सुरेश लाड आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यामध्ये सुरु असलेले शीतयुद्ध यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेली फुटीची शक्यता कसे रोखणार हा प्रश्‍न समोर आहे. त्यात आगामी काळातील रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी साठी देखील हि पक्षप्रवेशाची प्रक्रिया सुरु होत असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे.

दरम्यान, आगामी काळात होणार्‍या रायगड जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समिती यांच्या निवडणूक लक्षात घेऊन कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता आहे. याच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Exit mobile version