एनडीआरएफ आठवडाभरात रायगडात

जिल्ह्यातील महाड येथे असणार तळ

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने सुरुवात केली. या पावसात दरड कोसळण्यासह अनेक घरांची पडझड झाली आहे. 15 जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले आहे. 15 जुलैपासून म्हणजे आठवड्याभरात ही टीम रायगड जिल्ह्यात दाखल होणार असून, महाड येथे त्यांचा तळ असणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये तीन जून 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळ आले. या वादळाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. अनेकांचा थाटलेला संसार मोडला, काहींच्या घरांचे पत्र तुटले, भिंती कोसळल्या. आंबा, नारळ, सुपारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे नुकसान झाले. त्यानंतर 2021 मध्ये जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये महाडसह अनेक भागात पूर आला. तळीये गाव दरडीखाली गेला. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. या कालावधीत स्थानिक व एनडीआरएफ दलाच्या मदतीने जखमी, मृतांना ढिगाऱ्यातून काढण्यात आले. पुरात सापडलेल्या अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. या दुर्घटनेनंतर बोध घेत जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफ दल उभे करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. जिल्ह्यामध्ये 24 जूनपासून पावसाने सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला. गेल्या तेरा दिवसांपासून पावसाचा जोर कायमच आहे. कधी रिमझिम, तर कधी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामध्ये आतापर्यंत 26 पेक्षा अधिक घरांची पडझड झाली असून, महाड, पेण, मुरुड परिसरात दरड व दगड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

मागील दोन ते तीन वर्षांच्या अनुभवातून जिल्ह्यामध्ये जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत जीवित व वित्तहानीचा धोका नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ दलाला पाचारण केले आहे. 15 जुलैपासून हे दल जिल्ह्यात दाखल होणार आहेत. महाड येथे एनडीआरएफ दल असणार आहे. जिल्ह्यात मान्सूनच्या अंदाजानुसार, एनडीआरएफ दल जिल्ह्यात तळ ठोकून राहणार आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत या दलाची मदत होणार आहे.

जिल्ह्यामध्ये 15 जुलैपासून एनडीआरएफ दल पुण्यातून रायगड जिल्ह्यात येणार आहे. या दलामध्ये एकूण 25 कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. मान्सूनचा अंदाज घेऊनच हे दल महाड या ठिकाणी राहणार आहे. या दलाची आपत्कालीन परिस्थितीत मोठी मदत मिळेल.

सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड
Exit mobile version