आ.जयंत पाटील यांचे प्रतिपादन
। रोहा । प्रतिनिधी ।
काळ बदलला आहे, दिवसेंदिवस आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. यामुळे माणसाचे आयुर्मान वाढत आहे. पण वाढत्या वयानुसार येणार्या व्याधी व त्यावरील उपचार यांचा खर्च वाढत आहे. अशावेळी सर्वांनी आरोग्य विमा काढणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींनी देखील जनतेला आरोग्य विमा काढण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. आरोग्य शिबीर व आ धैर्यशील पाटील यांच्या आमदार फंडातून उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या उदघाटन प्रसंगी ते पुई येथे बोलत होते.
कार्यक्रमाला व्यासपीठावर शेकाप नेते धैर्यशील पाटील, शंकरराव म्हसकर, तालुका चिटणीस राजेश सानप, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक गणेश मढवी शामराव पेजे कॉलेज रत्नागिरी चेअरमन नंदकुमार मोहिते, नंदकुमार म्हात्रे, माजी सभापती लक्ष्मण महाले, विनायक धामणे, पांडुरंग ठाकूर, हेमंत ठाकूर, लियाकत खोत, राम गिजे, सुरेश कोतवाल, शिवराम महाबळे, मनोहर महाबळे, बबन म्हसकर, शांताराम महाडिक, शशिकांत कडू, प्रताप देशमुख, हरिश्चंद्र खांडेकर, अनंता वाघ, महादेव मोहिते, समीर महाबळे, बाळा भोईर, शरद कचरे, मारुती खांडेकर, गोरखनाथ कुरले यांच्या सह पुगाव पंचक्रोशीतील व रोहा तालुक्यातील शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व हरिभाऊ म्हस्कर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 36 जणांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. या निमित्ताने आयोजित आरोग्य शिबिरात डॉ आदित्य म्हामणकर,डॉ मोतीराम खंदारे, डॉ. अमोल खैरकर, डॉ. अंकिता खैरकर, डॉ. केतकी म्हसकर, डॉ. प्रणाली म्हसकर,डॉ भूषण खरीवले, डॉ. ज्ञानेश सर्कले, डॉ. अनघा सर्कले या उपस्थित डॉक्टरांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वांनी शंकरराव म्हसकर व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे स्व हरिभाऊ म्हसकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराची ग्रामीण भागात गरज असल्याचे सांगितले. आ धैर्यशील पाटील यांच्या आमदार फंडातून उभारण्यात आलेल्या सभागृहात वाचनालय सुरू करण्यात आले असून या वाचनालयात विविध विषयांवरची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. रोह्यातील साहित्यिक आरती धारप यांनी या वाचनालयाला भेट स्वरूपात विविध पुस्तके दिली त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना धैर्यशील पाटील यांनी शेकाप नेते शंकरराव म्हसकर यांच्या पक्षीय व सामाजिक कामाचे कौतुक केले. तसेच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहून त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवत असलेल्या म्हसकर कुटुंबातील तरुण मंडळींचे देखील कौतुक केले. डोलवहाळ धरणामुळे पुई, पुगाव, मढाली या गावातील शेतकर्यांच्या शेतीचे नुकसान होत होते. यासाठी शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या लढ्यामुळे मागील 30 वर्ष येथील शेतकर्यांना भरपाई मिळत आहे. मधल्या काळात भाताच्या आधारभूत किमती मध्ये वाढ झाली. पण भरपाई मध्ये मात्र वाढ झालेली नाही.
या भरपाई रकमेत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील धैर्यशील पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकरराव म्हसकर यांनी केले. त्यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत असताना स्व प्रभाकर पाटील यांच्या बद्दल सांगताना त्यांना गहिवरून आले. पुगाव हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असून हा गड असाच अभेद्य राहिल असे म्हसकर यांनी सांगितले.