प्रशासनाचे दुर्लक्ष; शासकीय जागेवर अतिक्रमण

कुर्डूस येथील ग्रामपंचायत कमिटी पंचाचा आरोप

। अलिबाग । प्रतिनिधी ।

आठवडा बाजारासाठी मागणी केलेल्या गट क्रमांक 332 मधील शासकिय जागेवर धनदांडग्यांनी अतिक्रमण केले आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रार अर्ज करूनही कारवाई केली जात नाही, असा आरोप कुर्डूस येथील ग्रामस्थ प्रभाकर पिंगळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे आठवडा बाजाराच्या जागेची प्रतिक्षा कायमच राहिली आहे.

अलिबाग तालुक्यातील कुर्डूस येथील गट नंबर 332 मध्ये महसूल विभागाची जमीन आहे. ही जमीन कुर्डूस गावालगतच लागून आहे. आठवडा बाजारासाठी ही जमीन मिळावी, यासाठी ग्रामपंचायत पंच कमेटी व ग्रामस्थ यांनी अनेक वेळा अर्ज करून मागणी केली आहे. बारा गुंठे जागा असलेल्या या जमीनीची मोजणी करण्यात आली. त्याप्रमाणे प्रशासनाच्या हालचालीदेखील सुरु झाल्या. गट. नं.332 मध्ये शासनाकडे 12 गुंठेची मागणी केली होती. परंतु पाच गुंठे जागा मोजून दिली होती. मात्र ती जागा नाकारली. या जागेत सुशीला म्हात्रे यांनी बांधकाम केले आहे. त्यांना बांधकामाची परवानगी गट. नं. 331 मध्ये दिली असताना त्यांनी गट नं. 332 मध्ये बांधकाम केले आहे. त्यामुळे या जागेची मोजणी करण्यात यावी, ही मागणी प्राधान्याने आहे.

हे बांधकाम त्वरित पाडून आठवडा बाजारासाठी जागा वर्ग करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. परंतु महसूल प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रभाकर पिंगळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी केला आहे. या जागेत बांधकाम खुलेआम होत असतानाही प्रशासन बघ्याची भुमिका घेत आहे. बांधकाम थांबविण्याची मागणी होत असताना त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही केला जात आहे. आठवडा बाजाराची परंपरा अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आहे. यातून स्थानिक शेतकर्‍यांनी पिकवलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळते. स्थानिक व्यवसायिकांनादेखील एक रोजगाराचे साधन खुले होते. त्यामुळे आठवडा बाजार हे महत्वाचे मानले जाते. परंतु आठवडा बाजारासाठी जागेची मागणी करूनही ती जागा देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्या जागेवर धनदांडग्यांनी केलेल्या बांधकामाकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची संतत्प प्रतिक्रीया उमटत आहे.

कुर्डूससह पंचक्रोशीतील अनेक गावे, वाड्यांमधील नागरिकांना जवळच बाजारपेठ निर्माण व्हावी, यासाठी शासकिय जागा आठवडा बाजारासाठी मिळावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. सुरुवातीला प्रशासनाकडून चांगला प्रतिसादही मिळाला. परंतु त्याच जागेवर काही धनदांडग्यांनी अतिक्रमण करून बांधकाम सुरु केले आहे. त्या जागेची मोजणी करून बांधकाम हटवून आठवडा बाजारासाठी जागा देण्यात यावी. परंतु प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. ही शोकांतिका आहे.

सुनील पिंगळे
ग्रामस्थ

ही जमीन गावकीची असल्याचे म्हणणे आहे. रायगड जिल्ह्यात गावकी व दळी जमीनीचे काय करावे, याबाबत कायद्यात काहीच प्रावधान नाही. या जमीनीबाबत काय करावे, याबाबत जिल्हा प्रशासनाने 2018 ला शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. गावाने जमीन खरेदी केली आहे. वैयक्तीक जमीनीवरील अतिक्रमण काढण्याचे काम शासनाचे नाही. आठवडा बाजारासाठी जागेची परवानगी लागत नाही. ग्रामपंचायत स्तरावरील हा विषय आहे. शासकिय जागेत अतिक्रमण केले असेल, तर संबंधित विभागामार्फत कारवाई केली जाईल.

संदेश शिर्के,
निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड
Exit mobile version