डोंगर, जंगल भागात मोठी अडचण
। अलिबाग । प्रतिनिधी ।
फळपिकांसाठी फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत विमा संरक्षित क्षेत्राची ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, डोंगर, जंगलभागात असलेल्या फळ पिकांची ई-पीक पाहणी करताना शेतकर्यांना अडचणी निर्माण होत आहेत. या पाहणीला मोबाईल नेटवर्कचा अडथळा जाणवत असल्याची प्रतिक्रिया शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी कशी करावी, असाही प्रश्न अनेक शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना दि.12 जून, 2024च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. या योजनेच्या निकषानुसार योजनेत सहभागी होणार्या शेतकर्यांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यामध्ये आंबिया बहार सन 2024-25 करिता युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत आंबा व काजू फळपिकांसाठी फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ज्या शेतकर्यांनी या फळपीक विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे, परंतु फळपिकांची ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्व्हे मोबाईल अॅपद्वारे केला नाही. त्यांनी 25 एप्रिलपर्यंत विमा संरक्षित क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अन्यथा योजनेच्या निकषानुसार ई-पीक पाहणी नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपीक विम्याचा लाभा दिला जाणार नाही, अशी सक्त ताकीददेखील कृषी विभागाने दिली आहे.
जिल्ह्यामध्ये 17 हजार हेक्टरहून अधिक आंब्याचे क्षेत्र आहे. तरुण मंडळीदेखील आंबा लागवडीवर भर देत आहे. आंबा उत्पादनातून शेतकर्यांना उत्पन्नाचे साधन खुले झाले आहे. मात्र, कृषी विभागाने ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्व्हे मोबाईल अॅपद्वारे करण्याचे आवाहन केले आहे. परंतु, काही शेतांमध्ये नेटवर्कचा अडथळा निर्माण होत आहे. आंब्याचे लोकेशन घेण्यापासून तेथील छायाचित्र अपलोड करताना अडचणी निर्माण होत असल्याची माहिती समोर येत आहे.
ई-पीक पाहणीबाबत शेतकरी अनभिज्ञ
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात फळ पिक विम्यासाठी ई-पीक पाहणी सुरु केली आहे. शेतकरी स्वतः ही पाहणी त्यांच्या मोबाईलवरून अॅपद्वारे माहिती पाठवू शकतात. ही प्रक्रीया समाधानकारक असली, तरीदेखील शेतकर्यांसाठी डोकेदुखील बनत आहे. आजही काही शेतकरी ई-पीक पाहणीच्या कामाबाबत अनभिज्ञन आहेत. ई-पीक पाहणी कशी करावी हे त्यांना माहित नाही. त्यामुळे गावातील तरुण मंडळीकडून शेतकरी ई-पीकची पाहणी करून घेत असल्याची माहिती समोर येत आहे.
आंब्याच्या उत्पादनात घट
जिल्ह्यात 17 हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र आहे. 14 हजारहून अधिक हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. यंदा आंब्याला मोहर चांगला आला. परंतु, बदलत्या वातावरणामुळे तुडतूड्या, फुलकीड सारख्या रोगाने आंब्याच्या वाढीवर परिणाम केला आहे. त्यामुळे अलिबागसह जिल्ह्यातील आंबा आता काढणीला सुरुवात झाली आहे. परंतु, यंदा आंब्याचे फक्त दहा टक्केच उत्पादन आहे. नव्वद टक्के उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याची माहिती समोर येत आहे.
कर्नाटकी आंब्याला देवगडची झालर
देवगड, रत्नागिरीमधील आंबा लाकडी पेटीमध्ये बंद करून नवी मुंबई व अन्य बाजारात विक्रीसाठी पाठविला जातो. परंतु, याच लाकडी पेट्यांचा आधार घेत कर्नाटकी आंबा, देवगडचा सांगून विकण्याचा प्रकार जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारात सुरु असल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी नाक्यानाक्यावर लाकडी पेट्यांमधून कर्नाटकी आंबा विकून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
यंदा मोहरावर वातावरणाचा परिणाम झाला. तसेच, कडक उन्हामुळे आंब्याच्या वाढीवरही परिणाम झाला. त्यामुळे यावर्षी आंब्याचे उत्पादन फक्त 10 टक्केच आहे. उत्पादनात अमुलाग्र घट झाली आहे.
मनोज पाटील,
आंबा उत्पादक शेतकरी