। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या 2 ऑगस्टला वडखळ येथे होणार्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या कानाकोपर्यात शेकाप नेते आणि चिटणीस मंडळाचे दौरे सुरु असून, या बैठकांमुळे शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
वर्धापन दिनानिमित्त गावोगावी होत असलेल्या संपर्क बैठकांमुळे लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
पनवेलपासून पोलादपूरपर्यंत मोठ्या प्रमाणावर बैठका होत आहेत. गावोगावी पक्षनेत्यांच्या सूचनेनुसार वर्धापन दिनाला शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकू लागले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणार वातावरणनिर्मिती होण्यास सुरुवात झाली आहे. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, रोहा, कर्जत, खालापूर, मुरुड, सुधागड, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, महाड, पोलादपूर या सर्वच तालुक्यांमध्ये संपर्क अभियान सुरु आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या विरामानंतर मोठ्या प्रमाणावर साजरा होत असलेल्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते वडखळ येथील वर्धापनदिन सोहळ्याला उपस्थिती लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अलिबाग तालुक्यात शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. मंगळवारी परहूर येथे पंडित पाटील यांची बैठक पार पडली. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य अरविंद पाशिलकर, माजी सरपंच जे.पी. घरत, खोपकर, शाळा समिती सदस्य सुधीर पाटील, तुकाराम गुंजाळ आदी उपस्थित होते.
या बैठकीला पंचक्रोशितील मापगाव, तळवडे, गोठेघर, परहूर, परहूरपाडा, जांभुळपाडा, झालखंड, कामार्ले आदी भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अरविंद पाशिलकर, सुधीर पाटील, जे.पी. घरत, दीपक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास मोठा आहे. मात्र, त्याचा विसर तरुणांना पडला असून, तो तरुणांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. वर्धापनदिनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी.
पंडित पाटील,शेकाप नेते