नवी मुंबई महिलांसाठी असुरक्षित!

बलात्कार, विनयभंगासह; 658 गुन्ह्यांची नोंद
2020 पेक्षा 21 मध्ये अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ
। संजय कदम । पनवेल ।
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांवर होणार्‍या अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. 2021 या वर्षामध्ये महिलांशी संबंधित बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, छळवणूक त्याचप्रमाणे छेडछाडीचे असे तब्बल 658 गुन्हे दाखल झाले आहेत. 2020 या वर्षाच्या तुलनेत 2021 या वर्षात बलात्कार आणि विनयभंगासह महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे महिलांसाठी नवी मुंबई किती सुरक्षित आहे? यावर सर्वसामान्य नागरिकांकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून, नोकरीचे आमिष दाखवून, शेजार्‍यांकडून, नातेवाईक यांच्याकडून, मित्र-ओळख करुन मैत्री करुन बलात्काराच्या घटना घडल्याचे दिसून येत आहे. यातील सर्वात जास्त बलात्काराच्या घटना या ओळखीच्या व्यक्तीकडून झाल्याचे आढळून आले आहे. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या (छळवणुकीच्या) घटनांमध्ये देखील नवी मुंबईत वाढ होताना दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबात पती-पत्नीमधील वाद टोकाला गेल्याने महिलांकडून कौटुंबिक छळाच्या तक्रारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कौटुंबिक छळवणुकीच्या तक्रारीच्या संख्येत वाढ होत असल्याने देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनामध्येही वाढ होताना दिसून येत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून 2021 या वर्षामध्ये सुमारे 300 अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. यात मुलींची सर्वात जास्त संख्या आहे. यातील सुमारे 185 मुला-मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अपहरण झालेल्या मुलींपैकी बहुतेक मुली या 15 ते 17 या वयोगटातील असून बहुतांश मुलींना प्रेम प्रकरणातून तसेच लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे. यातील अनेक मुलींनी प्रेमप्रकरणातून लग्न देखील केल्याचे आढळून आले आहे.

Exit mobile version