भावी आमदाराचे भवितव्य नवमतदारांच्या हाती
| पनवेल | वार्ताहर |
भारत निवडणूक आयोगाने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 42,798 नवमतदारांची वाढ झाली असून, हेच मतदार निर्णायक ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. या मतदारांच्या हाती आता भावी आमदारांचे भवितव्य असल्याचे बोलले जात आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात 6 लाख 34 हजार 197 मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारांमध्ये 3 लाख 37 हजार 909 पुरुष, 2 लाख 96 हजार 215 महिला आणि 73 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती पनवेल तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
पनवेल विधानसभा मतदारसंघात 18-18 वयोगटातील 13 हजार 259, 20-29 वयोगटातील 1 लाख 19 हजार 867, 30-39 वयोगटातील 1 लाख 66 हजार 56, 40-49 वयोगटातील 1 लाख 38 हजार 894, 50- 59 वयोगटातील 98 हजार 893, 60-69 वयोगटातील 60 हजार 749, 70-79 वयोगटातील 26 हजार 150 आणि 80 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील 10 हजार 338 मतदारांचा समावेश आहे. यावर्षी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत पनवेल विधानसभा मतदारसंघात 5 लाख 91 हजार 398 मतदार होते. आता निवडणूक आयोगाने सुरु केलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमानंतर या मतदारांमध्ये 42 हजार 798 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या 6 लाख 34 हजार 197 इतकी झाली आहे.
येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच झालेल्या मतदारांच्या संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमात पनवेल विधानसभा मतदारसंघात 42 हजार 798 नवीन मतदारांची वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्य विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. बुथ कमिटीपासून ते पदाधिकारीपर्यंत बदल केले जात आहेत. याशिवाय आता प्रशासकीय स्तरावरदेखील राज्य विधानसभा निवडणुकीच्या कामांना गती मिळाली आहे. त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल संकेतस्थळावर जाऊन आपले नाव तपासून पाहावे, असे आवाहन पनवेल तालुका तहसीलदार विजय पाटील यांनी केले आहे.