सुरक्षा कुंपणाची मागणी
। पनवेल । प्रतिनिधी ।
वीजपुरवठ्याची तक्रार सोडवून परतत असताना रेल्वेच्या धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सीकेटी कॉलेज ते बालभारती दरम्यान असलेल्या रेल्वे अंडरपासजवळ हा अपघात घडला. या घटनेमुळे रेल्वे ट्रॅक परिसरातील सुरक्षेचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल 2026 रोजी रात्री 8:15 च्या सुमारास मनोज पाटील व अमोल पैठणे हे दोघे ऑन-ड्युटी असताना बालभारती परिसरातील एका दुकानाच्या वीजपुरवठा दुरुस्तीसाठी गेले होते. तक्रार निवारण करून परतत असताना, अमोल पैठणे हे लघुशंकेसाठी रेल्वे ट्रॅकच्या कडेला गेले. मात्र, काळोख असल्याने ट्रेनचा अंदाज न आल्याने त्यांचा भीषण अपघात झाला. त्यांना तातडीने नाना धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तिथे यापूर्वीही अनेकदा अशा दुर्घटना घडल्या आहेत. सीएनजी पंप आणि रेल्वे अंडरपासचा हा परिसर अत्यंत रहदारीचा असूनही येथे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला कोणतेही सुरक्षा कुंपण (कंपाउंड) नाही. संरक्षक भिंत नसल्यामुळे नागरिक आणि कर्मचारी नकळतपणे मृत्यूच्या सापळ्यात ओढले जात आहेत. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या ठिकाणी तत्काळ लोखंडी जाळी किंवा भिंत बांधावी, अन्यथा भविष्यात अशा आणखी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृताच्या नातेवाईकांनी आणि सहकार्यांनी या ठिकाणी तातडीने सुरक्षा सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे.







