उमरोलीत नविन पाणीपुरवठा योजना मार्गी

आ.जयंत पाटील यांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन
। माणगाव । वार्ताहर ।
मोर्बा जिल्हा परिषद गटातील उमरोली गावातील नळपाणी पुरवठा योजना गेली अनेक वर्षापासून बंद होती. येथील महिलांना अर्धा किमी अंतरावरून पायपीट करून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत होते. युवानेते रमेश मोरे ययांनी या पाणी समस्येबाबत गावकर्‍यांना नविन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचा शब्द दिला होता. विभागातील पक्षाचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत यांच्या विशेष प्रयत्नांनी उमरोली गावात नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती त्याला प्रशाकीय मान्यताही मिळाली असून या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शेकाप ज्येष्ठ नेते आ.जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. रमेश मोरे यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केल्याने येथील ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. या कार्यक्रमास माजी आमदार पंडितशेठ पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार असून राजिपच्या अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुका चिटणीस मोरे यांनी दिली.

Exit mobile version