| पुणे | प्रतिनिधी |
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका विवाहित महिलेनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला वैतागून नवविवाहितेने इमारतीवरुन उडी घेत जीवन संपवलं. याप्रकरणी महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. स्वाती सुरज पाठक (23) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर, पती सुरज पाठक (26) याला वाघोली पोलिसांनी अटक केली. तर, सासू सुनिता पाठक (45), दीर निरज पाठक (23), यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती व सूरज यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. मुलाकडेच्या लोकांनी लग्नात 5 लाख रुपये व सोन्याच्या दागिन्यांची मागणी करुन लग्नात 1 लाख व 7 तोळे सोन्याचा हुंडा घेतला होता. लग्नानंतर मागणीप्रमाणे हुंडा दिला नाही, म्हणून स्वातीला मारहाण करुन मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली होती. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने पती व सासू यांनी गहाण ठेवून पैसे देखील घेतले होते. हे सोने सोडवून आणण्यासाठी तिच्याकडे 3 ते 4 लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे, लेकीच्या प्रेमासाठी व तिच्या सुखाच्या संसारासाठी तेव्हा स्वातीच्या वडिलांनी मुलाच्या कुटुंबीयांना आणखी 3 लाख रुपये दिले होते. मात्र, पैसे देऊनही स्वातीला घरगुती कारणावरुन वादविवाद करुन तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. सासरच्यांकडून सातत्याने होणाऱ्या या छळाला कंटाळून 7 जून रोजी स्वातीने मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.