| केज | प्रतिनिधी |
मराठवाडयाला सातत्याने पाण्याच्या दूष्काळाच्या झळा पोहचत आहेत. पश्चिम महाराष्ट्रसह इतर काही भागात महापूरामुळे गावेच्या गावे पाण्याखाली येतात. एका बाजूला पाण्याचे संकट तर दुसऱ्या बाजूला पाण्याचा महापूर अशी परिस्थिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यात हक्काची समन्यायी पाण्याची मागणी आहे. मात्र, समन्यायी पाणी देण्याच्या वल्गना सरकार करीत आहे. येथील जनतेला वेड्यात काढण्याचे काम सरकारकडून होत आहे. शेतकरी कामगार पक्ष कदाही खपवून घेणार नाही. मराठवाड्याला समन्यायी पाणी वाटप झाल्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे नेते सरचिटणीस जयंत पाटील यांनी केली. पक्ष बांधणी संदर्भात नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्षाचा राज्यस्तरिय मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एस. व्ही जाधव होते. यावेळी सहचिटणीस बाबासाहेब देवकर, शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, बाबुराव लागारे, चित्रलेखा गोळेगावकर नारायण गोले पाटील, उदय गवारे, विष्णुपंत घोलप, ॲड. गोविंद डुमणे, बाळासाहेब धस, तुषार गोळेगावर, किरण खपले, अमोल दिक्षीत, उत्तम अमृतराव, सुशिल सोमवंशी, राजाराम रसाळ, आसद बल्खी, शिवाजी सुरवसे, राजु सुरनर, अशोक रोडे, ॲड. निखिल बचुटे, मुंजा पांचाळ, मंगेश देशमुख आदी मान्यवर, पदधिकारी, शेकापचे कार्यकर्ते, महिला उपस्थित होते. मेळावा समन्वयक मोहन गुंड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सुत्रसंचलन हनुमंत घाडगे यांनी केले. तसेच प्रा.उमाकांत राठोड यांनी आभार व्यक्त केले.
महिला आयोगात शेकापला स्थान द्या- ॲड. मानसी म्हात्रे
राज्य महिला आयोग म्हणजे कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नाही. महिला आयोगात शेकापला स्थान द्या. शेतकरी कामगार पक्षाची आक्रमक महिला या आयोगात सदस्या म्हणून झाल्या पाहिजे. तरच राज्यातल्या महिलांच्या अन्यायाला वाचा फुटेल असे प्रतिपादन शेकाप राज्य महिला आघाडीच्या प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले.