1 जुलैपासून होणार जागेची मोजणी; साखळी उपोषण तात्पुरते स्थगित
| रसायनी | वार्ताहर |
पुनर्वसित नवीन शेवा गावाचे पुनर्वसन 1987 साली बोकडविरा येथील सर्व्हे नं. 112 मध्ये एकूण क्षेत्रफळ 33.64 हेक्टर जमिनीमध्ये झालेले असताना सिडकोकडून फक्त 10 हेक्टरमध्ये नवीन शेवा गावाचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. तसेच उर्वरित जागा सिडकोच्या ताब्यात असून, ती जागा ग्रामस्थांना मिळावी म्हणून अनेकवेळा मोर्चा, आंदोलन, उपोषण केलेली आहेत. परंतु, कित्येकवेळा ग्रामस्थांना आश्वासनाची खैरात देऊन पुनर्वसित नवीन शेवा ग्रामस्थांची फसवणूक केलेली आहे.
नवीन शेवा ग्रामपंचायतीने अनेक वेळा जेएनपीटी, सिडको, जिल्हाधिकारी रायगड व तहसीलदार उरण यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनसुध्दा आजपर्यंत आम्हाला जागेचा ताबा मिळालेला नाही, माजी आमदार मनोहर भोईर यांनी विधानभवनामध्ये विनंती अर्ज समिती समोर हा विषय घेतला होता. त्याहीवेळेस जमिनीचा ताबा देण्यात यावा, अशी विनंती अर्ज समितीच्या अध्यक्षांनी आदेश पारित केले होते. तरीसुध्दा सिडकोने त्या आदेशाचे पालन न करता केराची टोपली दाखविली. सदर विषय मार्गी लागावा म्हणून नवीन शेवा ग्रामस्थांनी साखळी उपोषणाचा इशारा देताच उपअधीक्षक भूमी अभिलेख उरण यांच्या विनंती पत्रानुसार शासकीय मोजणी 1 जुलैपासून करण्यात येणार असल्याचे लेखीपत्र तहसीलदार उरण यांनी नवीन शेवा ग्रामपंचायतीला देऊन साखळी उपोषण स्थगित करण्याची विनंती केली आहे. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उपतालुकाप्रमुख व ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील, सरपंच सोनल घरत, उपसरपंच रेखा म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य सतीश सुतार, वैशाली म्हात्रे, युवासेना माजी अध्यक्ष निलेश घरत, शेकाप गाव अध्यक्ष महेश म्हात्रे व उपशाखाप्रमुख अशोक म्हात्रे उपस्थित होते. दरम्यान, पुनर्वसित नवीन शेवा ग्रामस्थ 37 वर्षे न्यायासाठी विविध मार्गाने लढा देत आहेत.1 जुलै रोजी भूमी अभिलेख कार्यांलयाकडून जागेची मोजणी होणार असल्याने लढा यशस्वी होणार, अशी आशा पल्लवित झाली आहे.
