| अहमदनगर | वृत्तसंस्था |
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी अहमदनगरची ओळख होती. मात्र गेल्या तीन निवडणुकांमध्ये इथे भाजपने भगवा झेंडा रोवण्यात यश मिळवले आहे. 2009 मध्ये भाजपचे दिलीप गांधी यांनी राष्ट्रवादीच्या शिवाजी कर्डिलेंचा 46 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या राजीव राजळेंना 2 लाख मतांनी पराभूत केले. 2019 मध्ये भाजपने राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे पाटलांना मैदानात उतरवले. त्यांनी राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांना तब्बल पावणे तीन लाख मतांनी हरवले. विधानसभेचा विचार केला तर सध्या राष्ट्रवादीचे 4 आणि भाजपचे 2 आमदार आहेत.
यंदा भाजपने पुन्हा एकदा डॉ. सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिली आहे. तर आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने लोकसभेच्या रणांगणात उतरणार आहेत. लंकेंचा तगडा जनसंपर्क पाहता विखे विरुद्ध लंके अशी जोरदार काँटे की टक्कर इथे रंगणार आहे. सगेसोयरे आणि सोय-या धाय-यांचे राजकारण, हे नगरच्या राजकारणातले प्रमुख वैशिष्ट्यं… इथे विखे विरुद्ध थोरात असा उभा राजकीय संघर्ष आहे. या संघर्षात थोरातांचे नातेवाईक असलेले राजळे, त्यांचे नातेवाईक असलेले गडाख, कर्डिलेंचे जावई असलेले संग्राम जगताप आणि संदीप कोतकर नेमकी काय भूमिका घेतात, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.
दरम्यान, नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा थेट मुकाबला होणार आहे. असं असले तरी इथले सोयर्या धायर्यांचे राजकारण निर्णायक ठरणार आहे. सगेसोयर्यांचे गणित जुळवण्यात कोण यशस्वी होतो, ते येणार्या काही दिवसांत स्पष्ट होईल.