बाळसईत एकाच रात्री मंदिरासह नऊ घरे फोडली

ग्रामदेवता बेलजाई मातेच्या दागिन्यांसह दानपेटीतील रोकड लंपास

| नागोठणे | प्रतिनिधी |

नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळसई गावात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री ग्रामदेवता बेलजाई मातेचे मंदिर आणि नऊ बंद घरांना लक्ष्य करत धाडसी घरफोडी केली. या घटनेत मंदिरातील देवीच्या अंगावरील सुमारे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र व नथ, तसेच दानपेटीतील सुमारे आठ ते दहा हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. याशिवाय मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणाही चोरट्यांनी पळवून नेल्याने तपासासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी आधी रेकी करून बंद घरे हेरली असावीत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. चोरी करताना काही घरांच्या शेजारील घरांना बाहेरून कडी लावण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे चोरीदरम्यान कोणी बाहेर पडू नये किंवा प्रकाराची माहिती होऊ नये, यासाठी हा डाव आखण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

मंदिरातील चोरीप्रकरणी बेलजाई माता देवस्थानचे अध्यक्ष मधुकर ठमके यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बाळसई गावात यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर घरफोडीची घटना घडली नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. चोरी झालेल्या घरांमध्ये मुंबईत वास्तव्यास असलेले निवृत्त पोलीस अधिकारी भिकाजी पवार यांच्यासह भिकाजी जाधव, शरद जाधव, स्वप्निल पाटेकर यांच्या बंद घरांचा समावेश आहे. तसेच वाकण-आमडोशी-रोहा मार्गालगत असलेल्या शांताराम खांडेकर, दौलत कोकाटे आणि नारायण फराडे यांच्या घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले. याशिवाय मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या अनंत ठमके आणि कृष्णा मुंडे यांच्या घरांतही घरफोडी करण्यात आली.

घरमालकांपैकी बहुतांश जण कामानिमित्त मुंबई व ठाणे येथे वास्तव्यास असल्याने त्यांच्या घरातून नेमका किती ऐवज चोरीला गेला, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे चोरीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटनेची माहिती रविवारी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास बाळसईचे पोलीस पाटील पंकज कोकाटे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ नागोठणे पोलीस ठाण्याशी संपर्क साधत माहिती दिल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. दोन्ही पथकांनी मंदिरासह सर्व घरफोडी झालेल्या ठिकाणांची तपासणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले.

मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा चोरट्यांनीच लंपास केल्याने त्यांची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रेकी करून नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

Exit mobile version