कळंबुसरेतील 80 हून अधिक कुटुंबे वंचित
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील कळंबुसरे गावावर मागील वर्षी 26 मे रोजी कोसळलेल्या वादळी पावसाच्या संकटाला आज एक वर्ष पूर्ण होत असताना, शासनाच्या कामचुकार धोरणामुळे गावातील तब्बल 80 हून अधिक नुकसानग्रस्त रहिवासी आजही नुकसानभरपाईपासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नैसर्गिक आपत्तीत संसार उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना अद्याप मदतीची प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
26 मे 2025 रोजी सकाळी सहाच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने कळंबुसरे गावासह चिरनेर, सारडे आणि वशेणी गावांना अक्षरशः तडाखा दिला होता. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे 150 हून अधिक घरांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक घरांची छपरे उडून गेली होती, काही घरांच्या भिंती कोसळल्या होत्या, तर अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
घरांचे छप्पर उडाल्यामुळे विद्युत उपकरणे, कपडे, बेड, सोफा, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू अक्षरशः पावसात वाहून गेल्या होत्या. या संकटामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले होते. त्या वेळी प्रशासनाकडून युद्धपातळीवर पंचनामे करण्यात आले होते. नुकसानग्रस्तांना लवकर मदत मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र एक वर्ष उलटल्यानंतरही कळंबुसरे गावातील सुमारे 80 हून अधिक रहिवाशांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. शासनाच्या कामचुकार धोरणामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. नुकसानग्रस्तांना तात्काळ भरपाई मिळावी, हीच आमची मागणी आहे, असे ग्रामस्थ मनोज पाटील यांनी सांगितले.
