खारघरमध्ये ‘नो वॉटर, नो वोट’

| खारघर | वार्ताहर |

खारघर आणि तळोजा वसाहतीत सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून काही सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावर ‘नो वॉटर, नो वोट’ चे फलक लावण्यात आले आहेत. सिडकोकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेत नसल्यामुळे काही सोसायट्यांनी ‘नो वॉटर, नो वोट’ची भूमिका घेत लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

खारघर आणि तळोजा वसाहतीत काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सिडकोकडे पत्रव्यवहार, तसेच मोर्चे, आंदोलने करूनही दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सिडकोकडून करण्यात आलेल्या जाहिरातींमुळे नागरिकांनी लाखो रुपये कर्ज काढून घरे विकत घेतली. घराचे हप्ते फेडताना नाकीनऊ येत असताना त्यात काही सोसायट्यांमध्ये दररोज टँकरने पाणी विकत घेऊन गरजा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या काही सोसायट्यांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावर ‘नो वॉटर, नो वोट’चे बॅनर लावून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच काही सोसायट्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निश्‍चय केला आहे. याविषयी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बी. व्ही. गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

Exit mobile version