हवामान विभागाकडून मान्सूनबाबत पहिला अंदाज
| पुणे | प्रतिनिधी |
सध्या राज्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंघावत आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा जाणवत आहे. तापमान 40 अंशांच्या पुढेदेखील गेल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळाले. दरम्यान, देशात यंदा किती पाऊस पडणार याबाबतचा पहिला अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशभरात सरासरी इतका म्हणजेच सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आयएमडीकडून म्हणजेच भारतीय हवामान विभागाने एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये यंदा किती पाऊस होणार याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान, यावर्षी मान्सूनवर पडणार्या एल निनोच्या प्रभावाची शक्यता नाकारण्यात आली आहे. एल निनोमुळे पावसावर मोठा परिणाम होत असतो. प्रशांत महासागराचे तापमान वाढले की एल निनोची निर्मिती होत असते असे म्हटले जाते. एल निनोमुळे पर्जन्यमानामध्ये घट होत असते. मात्र, यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव पडणार नाही, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले. त्यामुळे देशभरात यावर्षी सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सून सामान्य होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून महिन्यात देशभरात उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवू शकतो. यंदा तापमान सरासरीपेक्षा जास्त असू शकते. उत्तर भारताच्या पूर्व भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज आहे. तापमान 45 अंशापेक्षा पुढे जाण्याचा अंदाज आहे.