| कल्याण | प्रतिनिधी |
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रकरण ऐरणीवर असतानाच कल्याण शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसूतीगृहात शांतीदेवी अखिलेश मौर्य (30) या महिलेला गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. तिची शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिची प्रकृती खालावली. तिला इंजेक्शन दिले गेले. तिला प्रसूतीगृहातून खाजगी रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या कुटुंबियांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे प्रसूती गृह असलेल्या या रुग्णालयात आयसीयु नसल्याचे देखील माहिती समोर आली आहे.
कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात राहणारी शांतीदेवी मौर्य ही महिला दोन महिन्याची गर्भवती होती. तिला याआधी तीन मुले आहे. तिच्या पतीने तिचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या शक्तीधाम प्रसूतीगृहात (दि.04) एप्रिल रोजी दाखल केले होते. सोमवारी (दि..07) दुपारी तीन वाजता तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी तिला भुलीचे इंजेक्शन दिले. यानंतर शांतीदेवी मौर्या यांची प्रकृती खालावली. त्यांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. मात्र, रुग्णवाहिका रस्त्यात असताना शांतीदेवी मौर्या यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
शांतीदेवी मौर्या यांना दिशाभूल करुन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचा दावा नातेवाईकांनी केला. धक्कादायक बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये आयसीयू सुविधा नसतानाही महिलांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. या शस्त्रक्रिया दरम्यान एखाद्या महिलेची प्रकृती खालावली तर तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले जाते. एक महिन्यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा महापालिकेच्या रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला आहे.