‘मेरा ई-केवायसी’ मोबाईल अॅप; 1 एप्रिल पासून कार्यान्वित
। कोर्लई । वार्ताहर ।
शासनाच्या रास्त भाव धान्य वितरण व्यवस्थेंतर्गत ई-पॉस मशीन सर्व्हरवरअभावी सातत्याने बंद पडत आहेत. एकीकडे धान्य वितरण कार्यालयाकडून ई-केवायसी करण्यासाठी तगादा लावला जात असताना, काही वेळा ई-पॉस मशीन बंद असल्याने ई-केवायसी करायचे तरी कसे? असा प्रश्न निर्माण होतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी ‘मेरा केवायसी मोबाईल’ अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे घरबसल्या ई-केवायसी करण्यात येणार आहे.
शासनाने रेशनधारकांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यासाठी मुदतही देण्यात आली होती. मात्र, त्या मुदतीत सगळ्याच शिधापत्रिकांधारकांचे ई-केवायसी होण्यात ई-पॉस मशीन बंद पडण्याच्या प्रकाराने प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. रेशनधारकांना ई-केवायसी बंधनकारक केल्याने रेशन दुकानात नागरिक गर्दी करत आहेत. मात्र, ई-केवायसी मशीन अनेक दुकानांत बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शासनाने अखेर या समस्येवर तोडगा काढत मोबाईलवर केवायसीसाठी अॅप विकसित केले असून, ग्राहक घरबसल्या केवायसी करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाने 28 फेब्रुवारी रोजी सूचनाही काढली आहे. 1 मार्चपासून हे अॅप कार्यरत झाले असल्याचे कळविण्यात आले आहे. ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्र, नवी दिल्ली यांनी ‘मेरा केवायसी मोबाइल’ अॅप विकसित केले आहे. त्यामुळे लाभार्थी स्वतः त्यांच्या मोबाईलमधून केवायसी पूर्ण करू शकणार आहे.
ही मोबाइल प्रणाली राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानांमध्ये जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांच्यासाठी ही योजना आहे. ई-केवायसी नसेल तर ‘मेरा केवायसी मोबाईल’ प्रणालीद्वारे ई-केवायसी पूर्ण करू घेण्यात यावी, अशा सूचना मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक निखिल तनपुरे यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत.