सुधागड तहसील कार्यालयात शुकशुकाट, नागरिकांमध्ये संताप
| पाली | वार्ताहर |
लोकसभा निवडणुकीच्या कामात रायगड जिल्ह्यासह सुधागड तालुक्यातील महसूल विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत. तहसिलदारसह शिपायांपर्यंतचे सर्व अधिकारी व कर्मचारी या कामात असल्याने अत्यावश्यक असलेल्या पुरवठा विभागाच्या कामासह दाखले, सातबारे, जमीनविषयक कामांवर परिणाम झाला असून तहसील कार्यालयातील कामासाठी ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांना उन्हाची काहिली सहन करत आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जवळपास एक ते दीड महिने येथील कामकाज ठप्प राहण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असल्याने महसूलसह सर्वच विभागांतील कर्मचार्यांना इलेक्शन ड्युटी करावी लागते. महसूल विभागातील जवळपास शंभर टक्के अधिकारी व कर्मचारी हे या कामात आहेत. निवडणूक कामात महसूल विभाग हा महत्वाचा भाग असल्याने सर्व प्रमुख जबाबदार्या या विभागावरच असतात. त्यामुळे जवळपास सर्वच स्टाफ हा निवडणुकीच्या कामासाठी सक्रिय ठेवला जातो. निवडणुकीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने ‘महसूल’मधील इतर कामांकडे पाहण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांना वेळ नाही. त्यामुळे पुरवठा विभागातील दैनंदिन कामांसह महसूलमधील दाखले, सातबारे, जमीनविषयक परवाने यांची कामे ठप्प झाली आहेत. तहसीलदार कार्यालय, तलाठी कार्यालयांमध्ये इथून पुढे जवळपास एक ते दीड महिना असेच चित्र राहणार असल्याचे चित्र आहे.
सुधागड हा आदिवासीबहूल तालुका असून डोंगर, दर्या-खोर्यातून येथील आदिवासी बांधवासह, ग्रामीण भागातील नागरिकांना पुरवठा विभागातील दैनंदिन कामांसह महसूलमधील दाखले, सातबारे, जमीनविषयक परवाने, शैक्षणिक दाखले काढण्यासाठी यावे लागते तरी त्यांना वरील दाखले निवडणुकीचे कामकाज सुरू असलेल्या काळात देखील मिळावेत अशी व्यवस्था तहसीलदार यांनी करावी.
रविंद्रनाथ ओव्हाळ,
सुधागड