प्रयोगशील शेतीचे अधिकाऱ्यांकडून कौतुक

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुका शेतीप्रधान तालुका समजला जातो. गेल्या काही वर्षात परंपरागत शेतीची परंपरा नव्या पिढीने हाती घेतली आहे. येथील शेतकरी मोठ्या संख्येने प्रयोगशील शेतीकडे वळलेला दिसून येत आहे. या प्रयोगशील शेतीची पाहणी वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी करुन शेतकऱ्यांचे कौतुक केले.

कृषी विभागाच्या ठाणे कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी संचालक बालाजी ताटे तसेच उपविभागीय कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर यांनी कर्जत तालुक्यातील प्रयोगशील शेती उपक्रमांची पाहणी केली. त्यामध्ये तालुक्यातील शेती उत्पदनावर प्रक्रिया करून बनविल्या जाणाऱ्या पदार्थांचा उद्योग सुरु करणाऱ्या नेरळ येथील प्रवीण फूड्सची पाहणी करून तेथील उत्पादने आणि पॅकेजिंगची माहिती घेतली. निकोप येथील अस्तरीकरण शेततळ्याची पाहणी कृषी अधीक्षकांनी केली. त्यावेळी स्थानिक शेतकरी रवींद्र झांजे, मधुकर झांजे, दूदा झंजे यांच्या शेती प्रकल्पांची पाहणी केली. त्यात शेततळे, पावर टिलर आणि आंबा लागवड यांची पाहणी केली. तर, नेरळ-कळंब रस्त्यावरील बिरदोले येथील शेतकरी परशुराम कालेकर यांनी बनविलेल्या पोल्ट्री फीड यंत्राची पाहणी आणि उत्पादित मालाची पाहणी करण्यात आली. भिवपुरी स्थानकाजवळील वावे येथील मनीषा गुंडे यांनी केंद्र सरकारच्या योजनांतून बनविलेल्या अस्तरीकरण शेततळे यांची पाहणी करण्यात आली.
याप्रसंगी बालाजी ताटे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवाजी फुलसुंदर यांच्यासह कर्जत तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी कर्जत दिनेश कोळी, कृषी पर्यवेक्षक सचिन केणे, किरण गंगावणे, सुदर्शन वायसे, कृषी सहायक विजय गंगावणे, अनिल रुपनवर, पंकज सोनकांबळे आणि लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version