। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
रशियन-युक्रेन युद्धाचे पडसाद अवघ्या जगावर उमटताना दिसत आहेत. त्यातच आता जेवणाच्या तेलाच्या किमतीतही वाढ झाली असून, ग्राहकांना सूर्यफूल तेलाच्या 15 लिटरच्या कॅनसाठी सुमारे 3,000 रुपये मोजावे लागत आहेत. सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
तीन महिन्यांआधी प्रति लिटर तेलाची किंमत 140-150 रुपयांच्या घरात होती. पण सध्या मात्र तीच किंमत 170-190 च्या घरात पोहोचली आहे. सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाचा वाईट परिणाम आयातीवर झाला आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांचा मेळ न बसल्यामुळे सूर्यफूल तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
“सोयाबीन आणि मोहरीचे पीक चांगले असल्याने भाव खाली येऊ शकतात आणि स्थानिक तेल उत्पादक येत्या काही दिवसांत चांगल्या प्रमाणात तेलाचा पुरवठा करू शकतात.” – बी.व्ही. मेहता ,सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया, कार्यकारी संचालक