एकावेळी करते 300 किमीचा प्रवास केरळच्या कोच्ची येथील एमकॉमचं शिक्षण पूर्ण केलेली 24 वर्षीय तरुणी सध्या जोरदार चर्चेचा विषय बनली आहे. डेलीशा डेव्हिस असं या तरुणीचं नाव असून तिला लहानपणापासूनच ड्रायव्हिंगची आवड आहे.
तिचे वडील डेव्हिस पीए हे गेल्या 42 वर्षांपासून टँकर चालवतात. त्याचमुळे डेलीशाला देखील ड्रायव्हिंगची आवड निर्माण झाली. दुचाकी आणि कार चालवण्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर डेलीशा हळूहळू मोठमोठे टँकर चालवायलाही शिकली. आता ती आपल्या वडिलांचं काम पाहते आणि वडील चालवत असलेला तेलाचा भलामोठा टँकर एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी ने-आण करण्याचं काम ती करतेय. गेल्या तीन वर्षांपासून डेलिशा कोची ते मलप्पुरम असा प्रवास आठवड्यातून किमान तीनवेळा तरी करते.
तेल रिफायनरी प्रकल्पापासून ते तिरूर येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल पोहोचविण्याचं काम ती गेल्या तीन वर्षांपासून करतेय. डेलिशा नेमकी आताच प्रकाशझोतात यायचं कारण म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी तिचा टँकर रस्त्यात अडवला होता. एक लहान मुलगी लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय महामार्गावर भलामोठा टँकर चालवतेय अशी माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तिला अडवलं होतं. पोलिसांनाही तिला पाहून धक्काच बसला होता. तिच्याकडे कागदपत्र आणि लायसन्सची मागणी केली.
सर्व कागदपत्र योग्य असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं.वाहतूक पोलिसांनी माझ्याकडची सर्व कागदपत्र तपासल्यानंतर माझ्या कामाचं कौतुक केलं आणि माझं अभिनंदन केलं. त्यासोबतच तू करत असलेलं काम लोकांपर्यंत पोहोचायला हवं जेणेकरुन इतर तरुणींना प्रेरणा मिळेल असं म्हटलं. गेल्या तीन वर्षांपासून मी टँकर चालवतेय आणि कुणीतरी माझी दखल घेतली याचाच मला आनंद आहे, असं डेलिशा सांगते.डेलिशानं वयाच्या 16 व्या वर्षापासूनच टँकर चालवण्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. पण मुलीचं पक्क लायसन्य येईपर्यंत वाट पाहायला हवी असं तिच्या वडिलांचं ठाम मत होतं. वयाच्या 20 व्या वर्षी तिला जड वाहतूक करण्याचं लायसन्य मिळालं. कारपेक्षा टँकर चालवणं खूप सोपं वाटतं असं डेलिशा म्हणते. एका फेरीत डेलिशा जवळपास 300 किमीचा प्रवास करते.