जुने साहित्य ठेकेदाराकडून लंपास

| पेण | प्रतिनिधी |

हेटवणे कालवा हा हेटवणे धरण ते कांदळेपाडा ग्रामपंचायतीपर्यंत असून, या कालव्यातून मोठ्याप्रमाणात पाणी गळती होत असल्याने शासनाने नव्याने पूर्ण कालव्यामधून पाईपद्वारे शेतकऱ्यांना पाणी देण्याचे ठरविले असून, या वर्षी कालव्याला पाणी न सोडता पाईपलाईनचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. परंतु, या कालव्यावरुन मोठ्याप्रमाणात नागरिकांना ये-जा करण्यासाठी लोखंडी पूल बांधण्यात आले होते.

साधरणतः एका पूलाचा विचार करता चार ते पाच हजार किलो वजनाचा लोखंडी पूल होता. अशा प्रकारचे साधरणतः चाळीस ते पन्नास पूल या कालव्यांवर बांधण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने पाईप लाईनचे काम सुरु होताच आधिकाऱ्यांच्या आर्शिवादाने हे पूल काढून भंगारात विकल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये तीन ते चार लोखंडी पूल शिल्लक आहेत. महत्वाची बाब म्हणजे एखाद्या सरकारी प्रकल्पातील जुन्या वस्तू ह्या सरकार दरबारी रितसर जमा करून त्यांचा लिलाव करण्यात येतो. परंतु, या कालव्यांवरील हे पूल एका युवा राजकीय नेत्याला हाताशी धरून भंगारात विकण्यात आले आहेत. याबाबत या कामावर देखरेख करणारे अधिकारी अल्पेश पाटील यांच्याशी कार्यालयात जाऊन तीन वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क झाला नाही. तसेच, या कार्यालयाच्या प्रमुख कपले मॅडम यांच्याबरोबर देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी हेतूपूरस्तर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना टाळले. त्या दरम्यान अल्पेश पाटील यांना भ्रमंती ध्वनीवरून संपर्क झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना उडवा उडवीची उत्तर दिली आहेत. यावरून निश्चितच हे लोखंडी जूने पूल विकण्यामागे अधिकारी वर्गाचा हात तर नाही ना? असा ही संशय व्यक्त होत आहे. तसेच स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरील अवजड पूल हे ठेकेदाराच्याच यंत्र सामुग्रीने काढण्यात आले असल्याचे समजते. या कामातील या जुन्या साहित्यांमध्ये ठेकेदार राजकीय मंडळी आणि अधिकारी यांनी संगनमताने मोठा भ्रष्टाचार केला आहे. या बाबत प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जलसंपदा मंत्र्यांची लवकरात लवकर तातडीने भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर टाकणार आहेत.

Exit mobile version