| मुंबई | प्रतिनिधी |
गुढीपाडव्याच्या पक्ष मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. स्वत: चा आब राखून महायुतीमधील उमेदवारांचा प्रचार करा अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, महायुतीच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो पाहून मनसैनिक नाराज झाले आहेत.
भाजप आणि मनसेत राज ठाकरे यांच्या फोटोवरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांचा फोटो बॅनरवर सन्मानजनक ठिकाणी लावा, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. मनसे सरचिटणीस नयन कदम यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना यावरुन सुनावले आहे. महायुतीत सन्मानजनक वागणूक देण्याची विनंती त्यांनी केली. सन्मानजनक फोटो असला पाहिजे. महायुतीच्या संकल्प मेळाव्याच्या बॅनरवरून मनसेने नाराजी व्यक्त केली. बॅनरवर फोटो लावायचा असेल तर सन्मानजनक ठिकाणी लावा अन्यथा लावु नका, असं मनसेने म्हटलं आहे. रामदास आठवले, महादेव जानकर यांच्या मागे राज ठाकरेंचा फोटो असल्याने मनसैनिक नाराज झाले. उत्तर मुंबईतील उमेदवार पियुष गोयल यांच्या महायुती संकल्प मेळाव्यातील बॅनरमुळे मनसेने नाराजी व्यक्त केली.