। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 240 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी पहिल्या दिवशी कमी अर्ज आले असताना आज दुसर्या दिवशी मात्र उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये 240 जागांसाठी सरपंच पदांचे 86 अर्ज दाखल करण्यात आले तर 1 हजार 940 सदस्यपदांसाठी सर्वच तालुक्यातील 239 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत.
दुसर्या दिवशी सरपंच पदासाठी अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींपैकी आठ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुरुड तालुक्यातील पाच ग्रापमध्ये दोन अर्ज दाखल झाले. पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी 28 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले. पनवेल तालुक्यात 10 ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्यात आला. उरणमध्ये 18 पैकी चार अर्ज सादर झाले. कर्जतच्या सात पैकी चार ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले. खालापूर तालुक्यात 14 पैकी तीन अर्ज सादर करण्यात आले. रोहा तालुक्यात पाचपैकी तीन तर सुधागड तालुक्यातील 14 पैकी आठ, माणगावमध्ये 19 पैकी तीन, महाड तालुक्यातील 73 ग्रामपंचायतींसाठी 12 सरपंच पदाचे अर्ज दाखल करण्यात आले.
पोलादपूर तालुक्यातील 16 पैकी चार सरपंचपदाचे अर्ज दाखल झाले. श्रीवर्धनमध्ये 13 पैकी दोन अर्ज सादर करण्यात आले. तळा आणि म्हसळा तालुक्यात अजूनही एकही अर्ज सादर करण्यात आलेला नाही. एकुण अर्जांची संख्या 111 एवढी झाली आहे.
त्याचप्रमाणे 240 ग्रामपंचायतींमध्ये 1हजार 940 सदस्यपदांसाठी 239 अर्ज दुसर्या दिवशी सादर करण्यात आले. यात अलिबागमध्ये सहा ग्रापच्या 46 जागांसाठी 11, मुरुड तालुक्यातील पाच ग्रापच्या 39 जागांसाठी एकमेव, पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या 226 जागांपैकी 103 अर्ज सादर करण्यात आले. पनवेलमध्ये 10 ग्रापच्या 94 जागांसाठी सात, उरण तालुक्यातील 18 ग्रापच्या 164 जागांसाठी 14, खालापूर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीच्या 118 जागांसाठी 11 अर्ज, रोहा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी 37 सदस्यपदांसाठी 14 अर्ज दाखल झाले.
सुधागड तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींपैकी 110 सदस्यपदांसाठी 26 नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. माणगाव तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या 167 जागांसाठी तीन अर्ज, महाड तालुक्यातील 73 ग्रामपंचायतीच्या 549 जागांसाठी 15, त्याचप्रमाणे पोलादपूर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 116 सदस्यपदांसाठी सात अर्ज भरण्यात आले. तर म्हसळा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींपैकी 97 जागांसाठी आठ अर्ज भरण्यात आला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या 99 जागांसाठी पाच अर्ज असे एकुण 239 अर्ज सादर करण्यात आले. आतापर्यंत एकुण 253 अर्ज सादर करण्यात आले आहेत.
240 ग्रामपंचायतींमध्ये अलिबाग तालुक्यातील सहा, उरण तालुक्यातील 18, कर्जत तालुक्यातील सात, खालापूर तालुक्यातील 14, तळा तालुक्यातील एक, पनवेल तालुक्यातील 10, पेण तालुक्यातील 26, पोलादपूर तालुक्यातील 16, महाड तालुक्यातील 73, माणगाव तालुक्यातील 19, मुरुड तालुक्यातील पाच, म्हसळा तालुक्यातील 13, रोहा तालुक्यातील पाच, श्रीवर्धन तालुक्यातील 13, सुधागड तालुक्यातील 14 या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.