| खोपोली | वार्ताहर |
हळदी समारंभात महिला, मुली असल्याने कपडे काढू नका, असे सांगण्यासाठी गेलेला तक्रारदार विलास वाघमारे याला दोघेजण मारहाण करीत असल्याने तक्रारदार यांचा भाऊ अनंता वाघमारे (40) भांडण सोडविण्यासाठी गेला. दरम्यान, त्याला लोखंडी कालथ्याने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला, तर तक्रारदार विलास वाघमारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. एक आरोपीला केळवली रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली असून, एकजण फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जांबरुंग आदिवासीवाडीतील कुमार विकास पवार याचा हळदी समारंभ सोमवार, दि.12 मे रोजी होता. हळदी समारंभात नाचताना आरोपी बाळू (बिंट्या) मुखणे (28), प्रकाश पवार (22) हे कपडे काढून नाचत असल्याने शेजारी राहणारा तक्रारदार विलास गोपाळ वाघमारे (42) याने हळदी समारंभात महिला, मुली असल्याने कपडे काढू नका, सांगितले. त्यानंतर त्याच्यात शाब्दिक वाद झाले. दोघांनी विलासला बाजूला घेऊन लोखंडी कालथ्याने डोक्यात मारले. यामध्ये विलासच्या डोक्याला दुखापत झाली. भावाला मारत असल्याचे बघून अनंता गोपाळ वाघमारे हा वाचविण्यासाठी गेला असताना दोघांनी अनंता याच्या पाठीवर आणि छातीवर लोखंडी कालथ्याने मारले. यामध्ये अनंता जमिनीवर कोसळला असता त्याला खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात उपचारासाठी आणत असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.