| अकोला | वार्ताहर |
मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरात मंगळवारी (दि.14) सायंकाळी दुचाकीने जात असताना मांजाने गळा कापल्याने एकाचा मृत्यू झाला. किरण प्रकाश सोनवणे रा. अकोट फैल असे मृतकाचे नाव आहे. शहरात पतंगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी मनपा व पोलिस प्रशासनाने नायलॉन मांजा विक्री रोखण्याचा खुप प्रयत्न केला. मात्र तरीसुद्धा छुप्या मार्गाने मांजाची विक्री सुरुच होती. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता नेहरू पार्क जवळील एनसीसी ऑफिसजवळून किरण सोनवणे (35) मोटारसायकलने जात होते. तेवढ्यात त्यांच्या समोरून पतंग उडत आली. काही क्षणातच पतंगाच्या मांजाने त्यांच्या गळ्याला वेढा घेतला. मांजाचा ताण इतका होता की, त्यांच्या गळ्याला खोल जखम झाली आणि श्वसन नलिकाही कापली गेली. घटनास्थळीच ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ त्यांना अकोला सर्वोच्च रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.