धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांतून होणार जल्लोष
। अलिबाग । प्रतिनिधी ।
घरोघरी आनंद, चैतन्य आणि उत्साहाचा वर्षाव करणार्या गणपती बाप्पांचे शनिवारी आगमन होणार आहे. संपूर्ण रायगडवासियांना आता गणरायाच्या आगमनाचे वेध लागले असून, ही उत्कंठा आता संपणार आहे. अवघ्या काही तासातच गणरायाचे घरोघरी आगमन होणार आहे. जिल्ह्यात एक लाख 3 हजार 297 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना सात सप्टेंबरला सकाळपासून केली जाणार आहे. त्यामध्ये एक लाख तीन हजार 24 खासगी, तर 273 गणेशोत्सव मंडळांमार्फत गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
गणरायाच्या स्वागतासाठी व सजावटीसाठी लागणारी फुले, फळे, वेगवेगळ्या रंगांची तोरणे, पूजेचे साहित्य अशा अनेक वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. समाजप्रबोधनाचे संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चलचित्रदेखील अनेक ठिकाणी तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. काही ठिकाणी महिला अत्याचार रोखण्याचे आवाहन, तर काही ठिकाणी शिक्षणाला महत्त्व देण्याचा प्रयत्न या चलचित्राच्या माध्यमातून केला जाणार आहे. काहींनी त्यांच्या घरी मूर्ती आणली आहे. तर, काही जण शुक्रवारी आणणार आहेत.
जिल्ह्यात शनिवारी (दि. 7) गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये दीड दिवसांचे 27 हजार, पाच दिवसांचे दोन हजार 558, सहा दिवसांचे 55 हजार, दहा दिवसांच्या 17 हजार 503 गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणरायाची मनोभावे सेवा करता यावी यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने तयारी केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमदेखील घेतले जाणार आहेत. सामाजिक उपक्रमही राबविले जाणार आहेत. महिलांसाठी संगीत खुर्ची, लहान मुलांसाठी फनी गेम्स, बाल्या नृत्यांचे सादरीकरणही काही ठिकाणी केले जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी काही मंडळांनी चलचित्राद्वारे महिला, स्त्रीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलिसांचा कडेकोट पहारा
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हा उत्सव आनंदात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी पोलिसांचा पहारा ठेवला जाणार असून, एक हजारहून अधिक पोलिसांच्या मदतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत. पोलिसांसोबत दोनशेहून अधिक होमगार्ड जवानांची मदतही घेतली जाणार आहे.
महामार्गावर वाहतूक पोलीस
मुंबई, ठाण्याकडून कोकणात जाणार्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना त्यांच्या गावी वेळेवर पोहोचता यावे, वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे कंबर कसली आहे. जिल्ह्यातील नव्वदहून अधिक वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस महामार्गावर रवाना झाले आहेत.