महामार्गावरील एक मार्गिका दुहेरी वाहतुकीसाठी खुली

| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर शहरातील अंडरपास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक मार्गिका दुहेरी वाहतुकीसाठी शनिवारी सायंकाळी खुली करण्यात आली. पोलादपूरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्यासह वाहतुक उपनिरीक्षक आदींच्या प्रमुख उपस्थितीत एलअ‍ॅण्डटी ठेकेदार कंपनीच्या अभियंत्यांनी फित कापून या मार्गिकेचे उदघाटन केले. पोलादपूर शहरातील महामार्ग आता चक्क 35 फुट खोल भुमिगत जाणार असून पोलादपूर शहर कधी गेले हे अंडरपास महामार्गावरील वाहनांच्या लक्षात देखील येणार नाही. पोलादपूर शहरातील भूसंपादन 45 मीटर रूंदीचे झाले असताना याठिकाणी बॉक्सकटींग पध्दतीने खोदकाम करण्यात येऊन शहरातून भुपृष्ठावरुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग आता अंडरपास म्हणजे भूमिगत जाणार आहे. आज शनिवारी सायंकाळी अंडरपास महामार्गावरील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येऊन पूर्वेकडील सर्व्हिस रोडवरून होणारी दुहेरी वाहतूक या भूमिगत अंडरपास राष्ट्रीय महामार्गावरून वळविण्यात आली आहे.


पुर्वेकडील आणि पश्‍चिमेकडील सर्व्हिस रोडचे बांधकाम अद्याप पुर्ण झाले नसून गटारसदृश्य फुटपाथ देखील अपूर्णावस्थेत आहेत. येत्या पावसाळयात पुर्वेकडील सर्व्हिस रोड सक्षम न झाल्यास त्यातून लाल माती ढासळून अंडरपास राष्ट्रीय महामार्गावर कोसळण्याचा धोका अधिक आहे. ठेकेदार एलऍंडटी कंपनीने रात्रंदिवस काम करुन बॉक्सकटींग केलेल्या अंडरपास राष्ट्रीय महामार्गाच्या खंदकाच्या दुतर्फा काँक्रीटचे फोमिंग करुन लालमातीचे ढिगारे अंडरपासच्या खंदकातून भुमिगत जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर कोसळू नये, यांची दक्षता घेतली आहे. मात्र, पोलादपूर शहरातील हा अंडरपास वाहतूकीचा प्रयोग प्रवासासाठी किती सुरक्षित असेल, हे येर्णाया काळातील अपघाताच्या संख्येसह सर्व्हिस रोडमधून लालमातीचे ढिगारे कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटनांच्या प्रमाणावरून स्पष्ट होणार आहे. पोलादपूर शहर हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गायब झाले असून पोलादपूर महाबळेश्‍वर वाई सुरूर रस्त्याचाही या चौपदरीकरणाच्या राष्ट्रीय महामार्गापासून संबंध तुटला असून केवळ सर्व्हिस रोडद्वारे पोलादपूर शहराबाहेरील सडवली रस्त्यावर तसेच श्रीकाळभैरवनाथ मंदिर कमानीजवळ गेल्यानंतरच महाबळेश्‍वरहून येणार्‍या अथवा जाणार्‍या वाहनांना भुमिगत महामार्गाशी संपर्कात येणे शक्य होणार आहे.

Exit mobile version