बारा लाखांची ऑनलाईन फसवणूक

| रसायनी | प्रतिनिधी |

भोकरपाडा येथील रिअल इस्टेट व्यावसायिकाचे व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक करून, त्याच क्रमांकावरून अकाऊंटंटला मेसेज पाठवत सायबर भामट्यांनी तब्बल 12 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू आहे.

भोकरपाडा येथील व्यावसायिक मानस नानक पारवाणी यांच्या क्रमांकावरून त्यांच्या अकाऊंटंट अनुराग दीक्षित यांना तातडीने 12 लाख रुपये ऑनलाइन वर्ग करण्याचा संदेश आला. मालकाचाच संदेश असल्याचे समजून दीक्षित यांनी दिलेल्या बँक खात्यात रक्कम जमा केली. काही वेळाने पारवाणी यांच्या खात्यातून 12 लाख रुपये वजा झाल्याचा संदेश आल्यानंतर त्यांनी अकाऊंटंटकडे विचारणा केली. त्यावेळी व्हॉट्सॲपवरून पैसे पाठविण्यास सांगितल्याचे समोर आले आणि फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पारवाणी यांनी रसायनी पोलिसांत तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि सायबर सेल तपास करीत असून, पैशांचा मागोवा घेऊन आरोपींचा शोध सुरू आहे. नागरिकांनी ऑनलाइन पैशांची मागणी करणाऱ्या संदेशांवर थेट विश्वास न ठेवता संबंधित व्यक्तीशी फोनवरून खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Exit mobile version