खैराच्या वृक्षांची खुलेआम कत्तल

| शहापूर | प्रतिनिधी |

शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्याच्या हद्दीतील वेहलोंढे गावाच्या डोंगरशेत परिसरात खैराच्या मौल्यवान वृक्षांची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. परिसरातील डोंगरशेत भागात मोठमोठी झाडे तोडली जात असल्याने वनसंपत्तीची अक्षरशः लूट सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. खैराच्या लाकडाला बाजारात मोठी मागणी आणि किंमत असल्याने या वृक्षांची बेकायदा तोड करून तस्करी केली जात असल्याची चर्चा परिसरात आहे.

विशेष म्हणजे मागील महिन्यातही याच परिसरात वृक्षतोडीची घटना घडली होती. त्यावेळी या प्रकाराला वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचा फोडण्यात आली होती. मात्र त्यानंतरही पुन्हा वृक्षतोडीचा प्रकार समोर येत असल्याने वनविभागाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीच्या घटनेनंतर संबंधित विभागाने नेमकी कोणती कारवाई केली, वृक्षतोड करणाऱ्यांचा शोध घेतला का, लाकडाची वाहतूक आणि तस्करी रोखण्यासाठी कोणती उपाययोजना केली. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

तानसा अभयारण्य हे जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे संरक्षित वनक्षेत्र आहे. अशा संवेदनशील परिसरात मौल्यवान वृक्षांची कत्तल होत असेल तर ही केवळ पर्यावरणाची हानी नसून वन्यजीवांच्या अधिवासावरही घाला आहे. जंगलातील मोठमोठी झाडे नष्ट होत असताना वनरक्षकांची गस्त, तपासणी आणि नियंत्रण यंत्रणा नेमकी काय करत आहे. असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.संबंधित विभागाने आता केवळ पंचनामा करून प्रकरण गुंडाळण्याऐवजी वेहलोंढेच्या डोंगरशेत परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी. मागील महिन्यातील वृक्षतोडीच्या घटनेपासून आतापर्यंत झालेल्या नुकसानीचा तपशील घ्यावा, तोडलेल्या खैराच्या झाडांची संख्या निश्चित करावी, लाकडाच्या वाहतुकीचे मार्ग शोधावेत आणि या प्रकारामागील सूत्रधारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version