उरण, पनवेलमध्ये शेकापच्या संवाद मेळाव्याचा झंझावात
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण ही स्फूर्ती देणारी भूमी आहे. पक्षाची पुनर्रचना करताना तरुणांना आणि महिलांना संधी द्या. ते संधीचे सोने करतील, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा दौर्याच्या निमित्ताने उरण येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात शनिवारी (दि. 8) आयोजित करण्यात आलेल्या शेकापच्या कार्यकर्ते मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील, राजिपच्या माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शेकापचे जिल्हा खजिनदार प्रीतम म्हात्रे, राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, तालुका चिटणीस विकास नाईक, शहर चिटणीस शेखर पाटील, लाल ब्रिगेड संघटना अध्यक्ष अतिश भगत, महिला शहरचिटणीस नयना पाटील, महिला तालुका चिटणीस सीमा घरत, उरण शेकाप सहचिटणीस सुरेश पाटील, रमाकांत पाटील, शुभांगी पाटील, नरेश घरत, दत्ता घरत, अतुल म्हात्रे, सागर कडू, जितेंद्र म्हात्रे, रवी घरत तसेच अन्य मान्यवर शेकापक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी लाल बावटे की जय असा जोरदार नारा दिला. यावेळी सभागृह दणाणून गेले.
यापुढे बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व काळातील चिरनेर जंगल सत्याग्रहाची भूमी आहे. कुळ कायद्याच्या अंमलबजावणी करणारी प्रमुख पक्षाच्या भूमी आहे. उरणमध्ये पक्षाचा झेंडा अ.ना. पाटलांनी रोवला. हे नवीन पिढीला माहीत नाही. स्वातंत्र्यानंतर 1952 साली पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी सगळ्या सीट आपल्या विधानसभेत गेल्या होत्या. त्यानंतर तटकरेंचे वडील ए.बी. पाटील यांच्यासह 75 टक्के पक्ष काँग्रेसमध्ये गेला होता. 1967 मध्ये पाच आमदार आणि एक खासदार निवडून आला. या निवडणुकीमध्ये आपण एकटे लढलो आणि आपल्या साडेचार लाख मते मिळविली. याची चर्चा कोण करत नाही का? ज्याने आपल्याला पाठिंबा दिला, त्यांनी आयत्या वेळेला फसवले. आपण दोन नंबरला आणि शिवसेना तीन नंबरला यातच आपला रिझल्ट लागला. आपल्या पक्षाचे काम आपल्यालाच प्रामाणिकपणे करायला पाहिजे. प्रत्येकाची जबाबदारी आहे. उरणमध्ये जवळजवळ 40 वर्षे दत्ता पाटील, विवेक पाटील, मीनाक्षी पाटील यांच्या रूपाने आपले आमदार होते. या संपूर्ण महालन भागाला आपल्याला सांभाळायचं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आता चेहरे नवीन निवडायला पाहिजे. तरुणाला पक्षात प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी ही बैठक आहे. परंतु, महत्त्वाचे म्हणजे, पक्षात आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर तरुणांना आणि महिलांना प्राधान्य देऊन त्यांच्यावर जबाबदारी टाकली पाहिजे. पक्षाचे जिल्हा चिटणीस तालुका चिटणीस असतील त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी चर्चा करा, भांडणे करू नका. त्यांना सूचना करा. आपली मते मांडा. आणि पक्षाचा विस्तार वाढवा. 20 दिवसांनी व्यापक बैठक होणार आहे. ज्यांना आपण मोठे केले ते सगळे पळून गेले. या ठिकाणी काम करत असताना बदल करायचा आहे. जिल्हा चिटणीस म्हणून 22 वर्षे मी काम केले. जिल्ह्यातील प्रत्येक गावा गावात आपले स्थान आहे. दक्षिण भागातही आपण वेगळ्या पद्धतीने काम केले आहे. प्रभाकर पाटील अध्यक्ष होते. त्यावेळी आपल्या पक्षाचे 17 सदस्य होते. परंतु, मी जिल्हा चिटणीस झाल्यानंतर 25 सदस्य आणले. आज आपण कमी कुठे पडतो? तर, शहरी भागात आपण कमी पडतो. एज्युकेशन वाढलेले आहेत. त्यानुसार त्यांना संधी द्या. शेकापक्षाची पारंपरिक घराणी आहेत. त्यांना विश्वासात घ्या. महत्त्व द्या. आम्हाला आजोबा, बापाचं नाव आहे. आम्ही कुठे वेड वाकडं वागत नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचा आम्ही सन्मान करतो. शिस्त ठेवा. उरणमध्ये पुढच्या वेळेला 201 टक्के आमदार निवडून आणून दाखवू. पक्षात बदल घडवून आपल्याला जे जे पाहिजे ते निश्चित करून दाखवू. वेगळ्या पद्धतीने काम करा. आज पक्ष संघटना मग जिल्हा परिषदेच्या गोष्टी करा. बदल केला तरच आपला विजय आहे. नवीन जिल्हा चिटणीस वेळ देणारे आहेत. त्यांना भेटाल तेव्हा ते वेळ देतील. तेही तुम्हाला दोन महिन्यांनी भेटायला येतील. माझ्यापेक्षा नवीन जिल्हा चिटणीस चांगले काम करतील, असे वाटते. ते बँकेचे व्हाईस चेअरमन आहेत. आणि मी त्यांची निवड जिल्हा चिटणीस म्हणून केलेली आहे. आपण एकत्र राहिलो तर कोणाची टाप चालणार नाही. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पक्षातून बाहेर काढून टाका.
तसेच, पक्षाची पुनर्रचना करताना तरुणांना, महिलांना संधी द्या. चित्रलेखा पाटील यांनी अलिबागमध्ये शंभर ते दीडशे महिला घडविण्याचे काम केले. मागील अलिबागच्या निवडणुकीत महिलांनी निवडणुकीची जबाबदारी सांभाळली, अशी परिस्थिती होती. आपल्याला साडेचार लाख मते पडली. ती कोणाची मते होती. आपण प्रचारात कमी पडलो. आपल्याला शेतकरी, कामगार, वकील अशा सर्व क्षेत्रातील आघाड्या तयार करायच्या आहेत. आणि पक्षाची ताकद वाढवायची आहे. विशेषतः येथे बहुसंख्य आगरी समाज असताना आगरी समाजाच्या विरोधात वेगवेगळी वक्तव्य करणारा आमदार, याला कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी अडवायचा आहे. सत्तेची घमेंड आणि पैशाचा माज या लोकांना आलाय. तो उतरवायचा आहे, असेही ते म्हणाले.
यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महिला राज्य आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे यांनी सांगितले की, शेतकरी कामगार पक्ष हा तीन पिढ्यांचा पक्ष आहे. या पक्षाला शिस्त आहे. तो एक विचारांचा पक्ष आहे. अलीकडे तरुणांचा उत्साह वाढत चालला आहे.तरुणांचा उत्साह पक्षाला ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज जिल्ह्यामध्ये पाच ते सात लाखांपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचे मतदार आहेत. पण, आपण सत्तेच्या स्थानी का पोहोचत नाही. विचार करायला पाहिजे. महिलांना पक्षात वेगळे स्थान देऊन पक्षातील ऊर्जा वाढवण्याचे काम करण्याची मागणी मी करत आहे. जिल्ह्यात पक्षांचे संघटन वाढवायचे आहे. हे संघटन केवळ मोजण्यासाठी नाही, तर स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी, पक्षाला नवी दिशा देण्यासाठी आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने फसव्या योजना आणल्या. पण, त्या योजना बंद होण्याची वेळ आली आहे. अशा फसव्या योजना टिकणार्या नाहीत. पण, महिलांचे संघटन जे संघर्षातून निर्माण झाले आहे, ते टिकणार आहे. महिलांना पक्षामध्ये वेगळे स्थान देऊन पक्षाची ऊर्जा वाढवण्याचे मदत होईल, अशी मागणी मी करते, असेही त्या म्हणाल्या.