| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपासारखं कडवं आव्हान समोर असताना आम आदमी पक्ष आणि काँग्रेस वेगवेगळे लढले. याचाच परिणाम म्हणजे ‘आप’वर स्वतःचाच बालेकिल्ला गमवण्याची वेळ आली. काँग्रेसने स्वबळावर दिल्ली विधानसभा निवडणूक लढल्यामुळे आपचा 17 जागांवर पराभव झाला आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यासारखे दिग्गज नेते पराभूत झाले. त्यांच्या पराभवासाठी काँग्रेसची मतेसुद्धा कारणीभूत ठरल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, भाजपने 48 जागा जिंकून दिल्लीची सत्ता काबीज केली आहे. तर, सत्ताधारी आम आदमी पार्टीला अवघ्या 20 जागाच जिंकता आल्या. त्यामुळे दहा वर्षांपासून असलेली सत्ता गमावण्याची वेळ आपवर आली. काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही.
भाजपने 27 वर्षांनंतर दिल्लीत पुनरागमन केले आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागले आहे. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला असून पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि इतर अनेक बडे नेतेही पराभूत झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारला असून, आपण लोकांसाठी काम करत राहू, असे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दुसकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत आम्ही दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि इथल्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही ही आमची गॅरंटी आहे. यासोबतच विकसित भारताच्या उभारणीत दिल्लीची महत्त्वाची भूमिका आहे, हे आम्ही सुनिश्चित करू. मला आमच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, ज्यांनी या जनादेशासाठी रात्रंदिवस काम केले. आता आम्ही आमच्या दिल्लीकरांच्या सेवेसाठी आणखी मजबुतीने काम करत राहू, असे आश्वासन दिले.
दादा गटाचे डिपॉझिट जप्त
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तब्बल 23 उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. पण, त्यापैकी सर्वांचा दारुण पराभव झाला आहे. या उमेदवारांचा फक्त पराभव झाला नाही तर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिल्लीत केवळ 0.03 टक्के मतेच मिळाली आहेत.