| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर असून, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नवीन विकासकामे करण्यास बंदी आहे. मात्र, तरी ही बेबी डिसुझा रस्त्यावर सुरू असलेल्या बांधकामांबाबत आता रायगड जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
माथेरानमध्ये पुन्हा एकदा अनधिकृत विकास कामांवरून वाद निर्माण झाला आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या माथेरानमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2003 साली माथेरान नगरपरिषद क्षेत्राला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले होते. त्यानंतर या भागात कोणतेही विकासकाम करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार माथेरान सनियंत्रण समितीची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, शहरातील बेबी डिसुझा मार्गावर काही खाजगी मालमत्ताधारकांकडून दगडी-मातीच्या रस्त्याचे नियमबाह्य उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी नगरपरिषद किंवा सनियंत्रण समितीची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे हे काम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी माथेरान नगरपरिषद आपल्या मालकीच्या रस्त्यावरून एका खासगी जागेकडे नवीन रस्ता तयार करून देत असल्याची बाब विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार यांच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर त्यांनी या कामाविरोधात रायगड जिल्हाधिकारी आणि माथेरान पालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.







