। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळ्याचे जागृत दैवत श्री धावीर महाराज यांची यात्रा शुक्रवारी (दि.11) संपन्न होत आह. चैत्र पौर्णिमेला म्हसळ्यातील श्री धावीर महाराजांच्या यात्रेपासून तालुक्यातील इतर यात्रांना सुरुवात होते. तालुक्यातील 84 गावांतील भाविक यात्रेत भक्तीभावाने मोठ्या उत्साहात आणि आनंदात यात्रेत सहभागी होत असतात.
पूर्वी या यात्रेला तालुक्यातील 35 ते 40 गावांतून काठ्या येत असत; मात्र, वाढती महागाई आणि झपाट्याने होणार्या शहरीकरणामुळे काठ्या येण्याचे प्रमाण घटले आहे. गेल्या काही वर्षापासून केवळ 15 गावांतील काठ्या यात्रेत सहभागी होत आहेत. केलटे गावातील काठीचा पूर्वापार प्रथम सन्मान करण्याची परंपरा असून त्यानंतर येणार्या सर्व काठ्यांचा सन्मान केला जातो. यादरम्यान, नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील चौकांत विद्युत दिव्यांची सोय व शहराची साफसफाईची व्यवस्था केली जाते.
म्हसळ्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज हे मुख्यदेव असून त्यांच्या समवेत रवळनाथ, अवळनाथ, बापूजी, जोगेश्वरी, भैरी आणि काळेश्री अश्या देवदेवतांच्या समवेत ही पालखी संपूर्ण शहरभर फिरते. तसेच, रात्री शहराची शिवा चर्मकार समाजाच्या मानकर्यांकडून बांधली जाण्याची परंपरा आजही कायम आहे. शिवा बांधल्याने गावामध्ये कोणत्याही प्रकारची रोगराई व साथ येत नाही. म्हणूनच म्हसळा धावीर देव महाराजांच्या यात्रेला जिल्ह्यात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.